पंढरपूर, दि. १८ जुलै २०२०: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी १ ऑगस्टला महाविकास आघाडी सरकारविरोधात राज्यव्यापी दूध दर आंदोलन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनाच्या तिरडीवर झोपलेले हे सरकार आहे आणि मंत्रिमंडळातील त्यांचे मंत्री हे क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली अशी टीका पुढे करत ते पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना दूधाचा भाव योग्य मिळताना दिसत नाही. शेतकरी संघटनांकडून याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र शासन स्तरावर काही निर्णय होताना दिसत नाही. सरकार दूध उत्पादकांना लुटणारच असेल, तर आम्ही फुकट दूध द्यायला तयार आहोत. सरकारने येऊन घेऊन जावे. पण जर सरकार जागे झाले नाही तर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकार ला दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी