पुणे, दि.२९ मे २०२०: “कोरोना संकटकाळात शासनाला विविध विषयांवर वारंवार निर्णय घ्यावे लागत आहेत. मोठ्या शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात स्थायिक झालेले, काम धंद्यानिमित्त शहरात असलेले गावकरी गावाकडे परतत आहेत. ठिकठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण होत असताना याकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज आहे. शारिरीक अंतर ठेवून व्यवहार करणे, लॉकडाऊन पाळणे तसेच सॅनिटायझर व साबणाचा वापर करण्याची सवय आता लावून घ्यायला हवी. प्रत्येकाने आपली आचारसंहिता ठरवून तिचे तंतोतंत पालन केल्यास या विषाणूजन्य आजाराला प्रतिबंध होऊ शकेल.” असे मत गुळुंचे (ता.पुरंदर) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच शिक्षक प्रवीण जोशी यांनी व्यक्त केले.
यावेळी जोशी म्हणाले की, आपला देश विविधतेत एकात्मकता असणारा देश आहे. ‘ सोशल’ म्हणजेच येथे लोक एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात. मदतीला धावून जातात तसेच दिलखुलास गप्पा मारत आपले मन मोकळे करतात. अशावेळी शारीरिक अंतर ठेवणे हा नियम अंगवळणी पडायला वेळ जात असला तरी लोक आता या आजाराचे गांभीर्य समजून नियमांचे पालन करत आहेत.
कष्टकटी, मजूर, रोजंदारीवर उपजीविका करणाऱ्या गोरगरीब शेतमजूर तसेच कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असुन त्याबाबत शासन स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. तरुणांनी याकडे डोळसपणाने पाहण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात गावागावात आता ग्राम कोरोना, आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन झाल्या आहेत. ग्राम रक्षक दल तसेच ग्रामदूतांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तर पोलीस दलाकडून संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, कोतवाल तसेच आरोग्य खात्याकडून वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आशा ताई, प्राथमिक शिक्षक जवळपास सगळेच प्रशासकीय विभाग लोक सुरक्षित राहावे यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून जीव धोक्यात घालून लढत आहेत.
परंतु, दुसरीकडे काहीजण नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. नियम पाळण्याची सवय आता लावून घेणे अत्यावश्यक ठरणारे आहे. इथे हेही लक्षात घ्यायला हवे की , नियम केवळ एखाद- दुसऱ्या व्यक्तीने पाळून कोरोनाला प्रतिबंध करणे शक्य नाही. नियम सगळ्यांनी पाळले तरच सगळे सुरक्षित राहणार आहेत. त्यामुळे समाज वाचवायची जबाबदारी आता समाजावरच आहे आणि पर्यायाने प्रत्येक कुटुंबावर आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर !
शासन लोकांच्या सुरक्षिततेसाठी झटत आहे तर दुसरीकडे प्रत्येक काम शासकीय कर्मचाऱ्यांचे किंवा गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींचे आहे असे समजून कोरोना प्रतिबंधाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर ढकलणे गैर आहे. शासकीय कर्मचारी, अधिकारी असो की लोकप्रतिनिधी तेही शेवटी माणूसच आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी सरकार काहीतरी करेल हा विचार आता काढून टाकायला हवा. पोलिसांची गाडी आल्यावर रस्त्यावरून पळून जात, कसे पोलिसांना फसवले या अविर्भावात वावरणा-यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, पोलीस तुमच्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी नव्हे ! त्यामुळे तुम्ही त्यांना फसवत नसून स्वतःच फसत आहात.
ग्रामीण भागात शहरातून येणारा प्रत्येकजण कोरोनाबधित आहे अशी भावना ठेवून त्यांचा दुस्वास करणे चुकीचे आहे. गाव कोणा एका व्यक्तीचे मिळून बनत नाही. कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या किंवा काही कारणास्तव गावातून बाहेर गेलेल्या व्यक्तीला या संकटकाळात गावाचा आधार वाटत असेल तर त्यासाठी गावाचे दरवाजेही खुले असावेत. गावात आल्यावर मात्र,अशा व्यक्तीने किंवा कुटुंबाने शासनाचे सर्व नियम पाळणेही तितकेच आवश्यक आहे. संस्थात्मक किंवा घरात विलगिकरण केलेल्या सर्वांनी नियम काटेकोर पाळायला हवेत. तर दुसरीकडे बाहेरून येणारा कोरोनाबधित नाही असे समजून नियमांचे पालन न करता त्याच्या संपर्कात जाणेही तितकेच चुकीचे आहे.
प्रत्येकवेळी गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, पोलीस, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारीच सगळे बघतील अशी भावना ठेवून आपली काही जबाबदारी नाही असे समजणे अयोग्य वाटते. सध्याच्या संकटकाळात सर्वात मोठी जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे असे वाटते. कारण व्यक्ती सुरक्षित राहिल्यास कुटुंब व पर्यायाने समाज, गाव, शहर सुरक्षित राहू शकेल. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आचारसंहिता पाळणे आवश्यक वाटते.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर