एसटीतून आजारी व्यक्तींचा मोफत प्रवास बंद, महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांचे आदेश

मुंबई, १५ जुलै २०२३ : एसटी महामंडळाच्या गाड्यांमधून विविध समाजघटकांना सवलतीत प्रवास देण्यात येतो. त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो. आता एसटीने अलिकडेच महिलांना ५०% सवलत जाहीर केली आहे. तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे. या सर्व सवलतीचा बोजा राज्य सरकारकडून वेळेत देण्यात आला तर एसटीला स्वावलंबी बनणायला वेळ लागणार नाही. परंतू आता एसटी महामंडळाने आता एका महत्वाच्या घटकाच्या सवलतीवर बंदी आणली आहे.

एसटी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर एसटीने अलिकडेच महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून ५०% तिकीटात प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. तसेच महामंडळाच्या प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे. एसटी महामंडळ विविध २९ समाजघटकांना प्रवासात सवलत देत असते. याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते. आता मात्र नवे परिपत्रक काढण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवाहतूक विभागाच्या २०१८ सालच्या परिपत्रकानूसार एसटीतून सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामुल्य प्रवास सवलत देण्यात आली होती. आता या घटकांना निमआराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही. सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना एसटीच्या निमआराम हिरकणी, वातानुकूलित अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापकांकडून देण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा