बारामती, दि. २८ जून २०२०: बारामतीत जोडप्याला अनुदानित शाळेत शिपायाची, क्लार्कची नोकरी मिळवण्याचे अमिष दाखवून दोघां व्यक्तींकडून १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीतल यशोदीप कला-क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष महिलेसह तिच्या पतीवर बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी देखील सैन्य भरतीच्या फसवणुकी प्रकरणी पतीवर गुन्हे दाखल आहेत.
यशोदीप शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा रामेश्वरी नितीन जाधव व नितीन तानाजी जाधव या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी मंगलसिंग गारद्या वसावे (ता. धनगाव, जि. नंदूरबार) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी आहे की संस्थेने २०१२-१३ मध्ये वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवरून फिर्यादी मंगलसिंग वसावे व त्यांचा नातलग संजय नरसिंग गावीत यांनी जाधव दांपत्यास नोकरी संदर्भात भेटले बारामती तालुक्यातील कर्हावागज व लोणंद येथील मूकबधिर शाळेवर वसावे व गावित यांना बोलवण्यात आले. शाळेंवर तुम्हाला कामाची संधी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून शिपाई पदासाठी ९ लाख रुपये द्यावे लागतील असे जाधव यांनी सांगितले.
मात्र त्यांनी ही रक्कम जास्त असून आम्हाला शक्य नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी चार लाख रुपये देऊन उर्वरित ५ लाख रुपयांना त्यांना २ महिन्यांची मुदत देण्यात आली.फसवणूक झालेल्या तरुणांनी पाच लाख रुपये त्यांच्या हवाली केले.
त्यानंतर त्यांना स्वामी समर्थ निवासी मूकबधिर विद्यालय बाळू पाटलाची वाडी येथे शिपाई म्हणून नोकरीचे पत्र देखील देण्यात आले त्या ठिकाणी चार वर्षे काम करून त्यांना कोणताही मेहनताना देण्यात आला नाही याबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. शेवटी कंटाळून २०१७ मध्ये या तरुणांनी नोकरी सोडली.या तरुणांनी या दाम्पत्याला पैशाची मागणी केल्यावर त्यांना धनादेश देण्यात आला मात्र तो धनादेश पास झाला नाही.या सर्व प्रकाराला कंटाळून मंगलसिंग वसावे व संजय गावित यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव