मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई, २ जानेवारी २०२३ : मालेगाव २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची मुक्तता याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत एनआयए कोर्टात सुरू असलेल्या मालेगाव ब्लास्टच्या खटल्याला स्थगिती देणार नाही, याचा पुनरुच्चार केला आहे.

नाशिकच्या मालेगावमध्ये २००८ ला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल प्रसाद पुरोहित आरोपी आहेत. त्यांना अटक करून नंतर जामिनावर मुक्त करण्यात आले होते. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप काढून टाकण्यासाठी कर्नल पुरोहितने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळून लावली आहे. कर्नल पुरोहितने त्याच्यावर खटला चालवण्यासाठी भारतीय सैन्याची परवानगी आवश्यक असल्याचा दावा केला. मात्र, एनआयएने पुरोहितचा हा दावा फेटाळला. अशी परवानगी केवळ कर्तव्यावर असताना झालेल्या गोष्टींबाबत लागते. मालेगाव बॉम्बस्फोट घडवणे हा पुरोहितच्या कर्तव्याचा भाग नव्हता, असे एनआयएने म्हटले.

मालेगावमधील एका मशिदीत २९ सप्टेंबर २००८ ला बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेत चारजणांचा मृत्यू झाला तर, १०१ पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी ८ जणांना यूएपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. यात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी, राकेश धावडे, सुधाकर द्विवेदी, दयानंद पांडे, सुधाकर चतुर्वेदी, प्रवीण टकलीकी या आरोपींना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत शिवनारायण कलसंग्रह, शाम साहू, अजय राहिरकर जगदीश म्हात्रे, साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामीन मिळालेला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा