सोलापूर, दि. ९ जुलै २०२०: संभाजी ब्रिगेड तर्फे कोविड केयर सेंटर कुर्डुवाडी येथील गैरसोयी निदर्शनास आणून देत श्रीमती ज्योती कदम, उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर बाबत ई-मेल द्वारे निवेदन देण्यात आले आहे. सदरील कोव्हीड केयर सेंटर कुर्डवाडी येथे ६ जून २०२० रोजी सुरु करण्यात आले आहे, परंतु अद्याप १ महिन्याच्या कालावधीत येथे रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. याबाबत पाहणी करून तात्काळ सोयी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागास सूचना द्याव्यात हि विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनात खालील मुख्य मागण्या करण्यात आल्या आहेत.
१) सदरील ठिकाणी रुग्णांसाठी बेड (खाट) उपलब्ध करून देण्यात यावेत.
२) सदर ठिकाणी महिला व पुरुष रुग्णांसाठी वेगळे विभाग कमीत कमी कापडी पडदे लावून बनवण्यात यावेत.
३) सदर ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची, टॉयलेट, बाथरूम इ. सोय करण्यात यावी.
कोरोना आजार व त्याचा प्रसार पाहता सदर कोविड केयर सेंटर आज पर्यंत सर्व सोयी सुविधांनीयुक्त स्वच्छ असे तयार होणे अपेक्षित होते, परंतु आज पर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही. प्रशासन याबाबतीत अत्यंत उदासीन असून लोकप्रतिनिधी देखील गायब असल्यामुळे माढा तालुक्यात सर्व सामन्यांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे असे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी नाराजीचा सूर आळवत व्यक्त केले.
याबाबतीत चौकशी करून दिरंगाई करणारे अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या वरती तात्काळ योग्य ती दंडनीय कार्यवाही करण्यात यावी असे मत ता. अध्यक्ष बालाजी जगताप यांनी मांडले.
वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता सदर घटनेबाबत प्रशासना तर्फे तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात येईल हि अपेक्षा व्यक्त करत, पुणे पदवीधर उमेदवार इंजि. मनोजकुमार गायकवाड यांनी माढा तालुक्यातील माढा व कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयांच्या सोयी सुविधांचा आढावा घेऊन तसेच माढा येथे प्रस्तावित कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील