पुणे, दि.११ जून २०२०: कोरोना लढाईला तीन महिने होत आहेत. याकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या समर्पित “कोविड आरोग्य केंद्राचा” ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, रिशाद प्रेमजी हे ऑनलाइन तर निर्मला पानसरे, डॉ. दिपक म्हैसेकर, विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, आयुष प्रसाद, भारत शेंडगे, डॉ.अशोक नांदापुरकर, डॉ.भगवान पवार, विप्रोचे उपाध्यक्ष हरिप्रसाद हेगडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, रणजीत शिवतारे, प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून ते आजची परिस्थिती यामध्ये आपण सुधारणा करीत फार पुढे गेलो आहे. राज्यात प्रारंभी दोनच चाचणी केंद्र होते. आज ८० हून अधिक चाचणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. लवकरच ही संख्या १०० च्या पुढे जाईल. कोरोना विषाणू हा संपूर्ण जगासाठी नवीन आहे. कोरोनाच्या विरुध्द लढाई लढत असतांना वेळेवर सुविधा निर्माण कराव्या लागल्या. त्यात आपल्याला यश येत आहे, ही सकारात्मक बाब आहे. सुरुवातीला आपल्याकडे ३५० आयसोलेशन बेड होते. आजच्या घडीला आयसीयू, आयसोलेशन, ऑक्सीजनयुक्त पुरेशा प्रमाणात सर्व बेड उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी