बारामती, २९ एप्रिल २०२० : कोरोना विरुद्धच्या लढाईत राबवण्यात येत असलेला ‘ बारामती पॅटर्न ’ देशाला मार्गदर्शक आहे, असे कौतुक खुद्द दिल्लीहून आलेल्या केंद्र सरकारच्या पथकानं केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही पुणे शहरासाठी ‘बारामती पॅटर्न’ राबविण्याची जाहीर मागणी केली आहे. ‘बारामती पॅटर्न’ मुळे कोरोनाला हरवण्याचा विश्वास लोकांमध्ये दृढ होत आहे. नागरिकांचा सहभाग, सहकार्यातून सुरु झालेल्या ‘बारामती पॅटर्न’ने कोरोनाच्या लढाईत ‘भिलवाडा पॅटर्न’चा विसर पडावा असे काम केले आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेतली तर विरोधकांकडून ‘बारामती पॅटर्न’वर होत असलेला आरोप निरर्थक असल्याची टीका नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी केली आहे. तथ्यहीन टीका करण्यापेक्षा विधायक सुचना कराव्यात आणि कोरोनाच्या लढाईत रस्त्यावर उतरुन योगदान द्यावे, असे आवाहनही नगराध्यक्षांनी विरोधकांना केले आहे.
कोरोनाचे संकट हे राज्यावर आलेले मोठे संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्य पातळीवर काम करत असताना त्यांचे बारामतीमधील प्रत्येक घडामोडीवर लक्ष आहे. ते सातत्याने बारामतीमधील परिस्थितीचा आढावा घेत असतात, आवश्यक त्या सूचना करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनासह बारामती नगरपालिकेने कंबर कसली आहे. त्याला तमाम बारामतीकरांची खंबीर साथ आहे.
कोराना विरोधातील ही लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे. या भयानक संकटाला ‘बारामती पॅटर्न’ च्या साथीनं तमाम बारामतीकरांनी थोपवून धरले आहे. त्यामुळे देशभर कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना, बारामतीत कोरोनाला रोखण्यात आपल्याला यश आले आहे. तमाम बारामतीकरांच्या साथीमुळंच हे शक्य झालं आहे. शासन, प्रशासन, सामाजिक संघटना, नागरिक, व्यवसायिक यांच्या समन्वयातून ‘बारामती पॅटर्न’ यशस्वी होत आहे. या पॅटर्नच्या जोरावरच आपण कोरानाला बारामतीकरांच्या घराबाहेरच रोखले आहे.
कोरानाच्या या लढाईत तमाम बारामतीकर तन, मन, धनाने सहभागी झाले आहेत. तसेच स्वयंशिस्तीचे दर्शन देत सर्वसामन्य बारामतीकर घरात राहून ही लढाई लढत आहेत. कोरोना विरुध्दची लढाई अनेक शहर ‘बारामती पॅटर्न’चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लढत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे शहरात ‘बारामती पॅटर्न’ राबविण्याची जाहीर मागणी केली होती. मग असे असताना त्यांच्या पक्षातील काही स्थानिक कार्यकर्ते ‘बारामती पॅटर्न’ला नाहक बदनाम करत आहेत. त्यांनी हे करताना किमान आपल्या नेत्यांच्या मताचा तरी विचार करायला हवा होता. कोरोना विरोधातील ही लढाई दिर्घकाळ चालणारी लढाई असल्याचे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनीही, या कठीण काळात राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. विरोधासाठी विरोध करणाऱ्या बारामतीमधील या मंडळींनी किमान त्यांच्या नेत्यांच्या सूचनांचे तरी पालन करावे.
करोना विरोधातल्या लढ्यात तमाम बारामतीकर जात-पात, धर्म, राजकीय विचारधारा बाजूला ठेवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे लढत आहेत. आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी हे जीवाची बाजी लावून ही लढाई लढत आहेत. तरी या सर्वांच्या त्यागाचा आदर करावा, प्रशासनाच्या आणि सामान्य बारामतीकरांच्या मनोधैर्यावर परिणाम होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, बेछुट आणि बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव