नाशिक, दि.२२ मे २०२० : जिल्हा बँकांची सद्यपरिस्थिती पाहता राष्ट्रीयकृत बँकांनी जास्तीचा पिक कर्ज पुरवठा करण्यासाठी संबंधित बँकांना राज्यस्तरावरून सूचना देण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
यंदाच्या राज्यस्तरीय खरीप पूर्व आढावा बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. जिल्ह्यातील कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ, सामुहिक शेततळे व संरक्षित शेतीच्या बाबींसाठी जिल्ह्यास लक्षांक वाढवून मिळावा तसेच रेल्वेने कांदा वाहतूक केल्यावर लॉकडाऊनच्या परिस्थितीत वेळेवर मजूर उपलब्ध होत नसल्याने लागणारे विलंब शुल्क माफ करण्यात यावेत, यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात यावी.
तसेच अनु.जाती व जमातीच्या लाभार्थ्यांच्या धर्तीवर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना विहीर या घटकाचा लाभ देण्याची नवीन योजना शासनस्तरावरून प्रस्तावित करण्यात यावी. हंगामी द्राक्ष पिकाबाबत कृषी विद्यापीठाने संशोधन हाती घ्यावे व त्यांच्या शिफारशीनुसार फळ पिक विमा योजनेमध्ये पुर्व हंगामी द्राक्ष पिकाचा समावेश करावा असंही भुजबळ यांनी सांगितले आहे.
मागेल त्याला शेततळे ही योजना सन २०२०-२१ मध्ये सुरु ठेवून शेतकऱ्यांना प्रती शेततळे रुपये ५०,००० एवढी वाढ करून रु.७५,००० अनुदान मिळावे, तसेच महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत जिल्ह्यातून १ लाख ३७ हजार शेतकरी पात्र आहेत. मात्र ग्रामपंचायत निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे अनेक लाभार्थ्यांना लाभ अद्याप मिळालेला नाही तो त्यांना तात्काळ दिला जावा, अशा सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केल्या.
न्युज अनकट प्रतिनिधी: