मुंबईत विविध कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; ‘सीबीआय’ने टाकले डझनभर ठिकाणी छापे

मुंबई, १३ जानेवारी २०२३ : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील कंपन्यांच्या फसवणुकीच्या वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांच्या तपासासंदर्भात ‘सीबीआय’ने गुरुवारी (ता.१२) देशभरात सुमारे १२ ठिकाणी छापे टाकले. मुंबईतील अंधेरी परिसरातून अशाच एका फसवणूक प्रकरणातील आरोपींच्या कार्यालयातून ९० हजार ४१३ डॉलर आणि १ कोटी ९९ लाख रुपये जप्त केले. केंद्रीय तपास यंत्रणेने ३० डिसेंबर रोजी मुंबईस्थित कंपनी पीएसएल लिमिटेड आणि तिच्या संचालकांविरुद्ध एफआयआर नोंदविला होता. त्याच्यावर कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक आणि एक्झिम बँकेची २१७ कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दाखल तक्रारींनुसार, पाईपचे बांधकाम आणि कोटिंगचे काम करणाऱ्या या कंपनीने बँकेकडून कर्ज घेतले आणि पैसे योग्य ठिकाणी गुंतविण्याऐवजी ते इतरत्र टाकले. २०१० ते २०१५ दरम्यान हा बनाव करण्यात आला.

‘सीबीआय’ने देशभरात टाकलेल्या १२ ठिकाणांपैकी ८ ठिकाणे मुंबईतील आहेत. बाकीचे प्रत्येकी एक ठिकाण दिल्ली, नोएडा, कच्छ आणि दमणशी जोडलेले आहे. एजन्सीने डीएन सहगल यांच्या अंधेरी कार्यालयातून $९०,४१३ आणि १.९९ कोटी रुपये वसूल केले. याशिवाय अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

याशिवाय आणखी एका प्रकरणात ‘सीबीआय’ने मुंबईतीलच आणखी दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बँकांची ६ हजार ६४५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. यापैकी एक एफआयआर बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरून प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि तिच्या चार संचालकांविरुद्ध नोंदविण्यात आला आहे. तक्रारदार बँकेच्या म्हणण्यानुसार, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीने १७ बँकांच्या मुख्यत्वे बँक ऑफ बडोदा यांच्याकडून ४ हजार ९५७ कोटी ३१ लाखांचे कर्ज घेतले. या कंपनीने २०१४ ते २०१७ या कालावधीत ही रक्कम योग्य ठिकाणी न टाकता वळती केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सीबीआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने आपली उलाढाल वाढविण्यासाठी बनावट व्यवहारांच्या नोंदीही दाखविल्या. डिसेंबर २०१७ मध्ये, कंपनीचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (NPA) म्हणून घोषित करण्यात आले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा