मुंबई, दि. २२ जून २०२०: कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आज देखील कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झालेली दिसली आहे. ही वाढ सलग १६ व्या दिवशी होताना दिसत आहे. आज पेट्रोलचे दर प्रतिलिटर ३३ पैशांनी वाढले आहे तर डिझेलच्या बाबतीत ५८ पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या पंधरवड्यात पेट्रोल दर प्रतिलिटर तब्बल ९.२१ रुपयांनी महाग झाले आहे.
कोविड -१९ च्या प्रभावामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. परंतू ७ जून पासून सातत्याने कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत चालल्या आहेत. त्याचाच परिणाम आता भारतातील कच्च्या तेलाच्या किमतींवर देखील दिसून येत आहे.
पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ७९ रुपये ५६ पैशांवर पोहोचला आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलचे दर प्रतिलिटर ७८ रुपये ८५ पैसे झाले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात इंधनाच्या विक्रीत प्रचंड घट झाली होती. त्यामुळे १६ मार्च ते ५ मे या कालावधीत देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते. या काळात कच्च्या तेलाच्या किमती मात्र वाढत होत्या. हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. इंधनाच्या किमतीत उत्पादन शुल्क, स्थानिक कर, व्हॅट, अधिभार यांचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्यक्षात इंधनाचे दर ग्राहकांसाठी प्रचंड चढ्या प्रमाणात असतात. राज्य सरकारने या महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅटवरील अधिभार म्हणून प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी