मोहोळ, सोलापूर ५ डिसेंबर २०२३ : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या साईबाबा मतिमंद आणि मूकबधिर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक राजू खरे हे होते. यावेळी संस्थेतर्फे उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना राजू खरे यांनी दिव्यांगांना विकासाच्या प्रवाहात आणणे हे सर्वांचे कर्तव्य नाही तर सर्वांची जबाबदारी देखील आहे, त्यामुळे त्यांच्या विकासासाठी जे काही शक्य आहे ते करणार असुन त्यांना सर्वतोपरी मदतीचा हात देणार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी मुलांच्या अल्पोपहारासाठी रोख ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली, तसेच येणाऱ्या काळात देखील संस्थेला भरीव निधीची मदत करणार असल्याचे देखील आवर्जून सांगितले. यामुळे आता ‘हाक दिव्यांगाची,साथ राजू खरे यांची’ असे देखील या माध्यमातून संपूर्ण मोहोळ तालुक्यात चर्चा होऊ लागली. कारण यापुर्वीही या संस्थेत अनेक नेते पुढारी येऊन गेले त्यांनी फक्त मदतीची घोषणाच केली होती.
पुढे बोलताना खरे असेही म्हणाले की, दिव्यांग हा समाजाचा अतूट घटक असून सर्वांनी त्यांच्या व्यंगाकडे न पाहता माणूस म्हणून त्यांना आपुलकीची वागणूक देत विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी उपस्थित असलेल्या मूकबधिर व दिव्यांग मुलांनी आपल्यामध्ये असलेल्या कला सादर केल्या आणि उपस्थित मान्यवरांची व लोकांची मने जिंकली. यावेळी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झालटे साहेब, प्रकाश(दादा)पारवे, चंदनशिवे सर, अमर सोनवले, समाधान बाबर, बेगमपूर गावचे सरपंच प्रकाश सपाटे, रामहिंगनीचे सरपंच संभाजी लेंगरे, हराळवाडीचे सरपंच लिंगराज व्हनमणे, सतीश जाधव तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनीधी : नवनाथ खिलारे