

मुंबई, ११ नोव्हेंबर २०२० : राज्यात काल कोविड १९ चे १० हजार ७६९ रुग्ण बरे झाले असल्याचं आरोग्य विभागानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या प्रसिद्धीपत्रकात ४६ मृत्यूंची नोंद आहे. सोमवारी कोविड पोर्टल मधील तांत्रिक बिघाडामुळे त्यादिवशीची आकडेवारी प्राप्त होऊ शकली नव्हती. त्यामुळे काल जाहीर केलेली बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी आणि मृत्यूच्या नोंदी २ दिवसांतल्या आहेत. काल नोंद झालेल्या एकूण ४६ मृत्यूंपैकी ३७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत असा खुलासाही आरोग्य विभागानं केला आहे.
बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन ही माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.
कालच्या प्रसिद्धीपत्रकातल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत कोविड १९ चे एकंदर १५ लाख ८८ हजार ९१ रुग्ण बरे झालेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१.९६ शतांश % एवढं झालं आहे.
काल राज्यात ३ हजार ७९१ नवीन रुग्णांचं निदान झालं. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या १७ लाख २६ हजार ९२६ वर पोहोचली. यापैकी सध्या ९२ हजार ४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोविड १९ मुळे दगावलेल्यांची एकंदर संख्या आता ४५ हजार ४३५ झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ शतांश % एवढा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी