Cyber fraud Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी एमआयडीसीत एका कंपनीला सायबर चोरट्यांनी तब्बल १ कोटी ९५ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकाउंटंटला बनावट मेसेज पाठवून, स्वतःला कंपनीचा संचालक भासवणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने क्लायंटला त्वरित पेमेंट करण्याचे निर्देश दिले. या भूलथापांना बळी पडून अकाउंटंटने मोठी रक्कम पाठवल्यानंतर हा फ्रॉड उघडकीस आला. मात्र, सायबर पोलिसांनी तत्परता दाखवत २४ तासांच्या आत गुजरातमधून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, तसेच गुन्ह्यातील १ कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. जेनील वसंतभाई वाघेला (वय २२, कामरेज, सुरत, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
भोसरी एमआयडीसीतील एका प्रतिष्ठित कंपनीच्या अकाउंटंटला अज्ञात व्यक्तीने टेक्स्ट मेसेजद्वारे संपर्क साधला. मेसेजमध्ये त्याने स्वतःला कंपनीचा संचालक असल्याचे भासवले आणि क्लायंटला तातडीने मोठी रक्कम देण्याची सूचना केली. या बनावट आदेशावर विश्वास ठेवून अकाउंटंटने तब्बल १ कोटी ९५ लाख रुपये एका बँक खात्यावर ट्रान्सफर केले. काही वेळानंतर, जेव्हा कंपनीच्या खऱ्या संचालकांना खात्यातून मोठी रक्कम गेल्याचा संदेश मिळाला, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. तातडीने अकाउंटंटने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन या फसवणुकीची तक्रार दाखल केली.
भोसरी एमआयडीसीत मोठा सायबर घोटाळा उघड
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सायबर पोलिसांनी त्वरित तपासाला सुरुवात केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यात वापरलेले बँक खाते आणि इतर संबंधित माहिती जमा केली. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, संशयितांनी चोरी केलेली काही रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर वळवली आहे. त्याचबरोबर, यातील काही रक्कम सुरत जिल्ह्यातील कामरेज परिसरातून काढली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने गुजरातमध्ये धाव घेतली आणि जेनील वाघेला याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान जेनीलने त्याचा साथीदार प्रिन्स विनोदभाई पटेल आणि नकुल खिमाने यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्ह्यातील १ कोटी रुपयांची मोठी रक्कम गोठवण्यात यश मिळवले आहे. उर्वरित रकमेचा शोध घेण्यासाठी आणि फरार असलेल्या इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे सायबर गुन्हेगार किती सक्रिय आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. नागरिकांनी आणि विशेषतः कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी अशा फेक मेसेज आणि अज्ञात व्यक्तींच्या संपर्काबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे