नवी दिल्ली १९ जून २०२३ : राजस्थानमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचं थैमान सुरू असून पाली, सिरोही, राजसमंद, उदयपूर, बाडमेरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. राजस्थानमधील आतापर्यंत ५०० हून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित झालाय तर वाळवंटात पूरस्थिती आहे. राजस्थानात सुमारे ३०० मिमी पाऊस झाला आहे. एकीकडे राजस्थान,दिल्ली, मध्यप्रदेशात पावसाची हजेरी लावली आहे. तर उत्तरप्रदेशात बिहार, उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड मध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय यामुळे यु.पी., बिहार राज्यांना दिलासा मिळणार आहे, कारण उष्णतेच्या लाटे मुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत जीव गमावणाऱ्यांचा आकडा १०० च्या पुढे गेलाय. सध्या यूपी बिहारसह पूर्ण उत्तर भारतात उष्णतेचा पारा वाढला असून भारतीय हवामान विभागाने यूपी आणि बिहारच्या अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी केला आहे. बिहारच्या बांका, जमुई, जहानाबाद, खगडिया, लखीसराय, नालंदा, नवादा, पटना, समस्तीपूर, शेखपुरामध्ये हवामान विभागाने तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे, परंतु पावसाची पण शक्यता निर्माण झाल्याने येथील तापमानात नक्कीच घट होईल अशी आशा येथील लोकांना लागुन राहिली आहे.
तिकडे आसाममध्ये मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची वाढ झाली आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून पुढच्या पाच दिवसांत देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आसाम राज्यातील तीन जिल्हे पुराच्या पाण्यात बुडाले असुन, १० जिल्ह्यातील जवळपास ३८००० नागरिकांना पूराचा फटका बसला आहे. त्यासोबतच २१५.५७ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आहे.
येत्या ३ ते ४ दिवसात महाराष्ट्र राज्यात, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय, तर कोकणात मान्सून पुढे सरकण्याची परिस्थिती असून २२ जूननंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. याउलट विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी- वैभव शिरकुंडे