बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार, ७४,००० नागरिकांचं स्थलांतर

द्वारका, गुजरात १५ जून २०२३: बिपरजॉय चक्रीवादळामुळे भारतातील गुजरात, महाराष्ट्र, गोवा यासह एकूण आठ राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ आज दुपारनंतर गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर लष्करासह एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. त्याचबरोबर किनारपट्टी भागातून सुमारे ७४,००० लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली.

गुजरातच्या द्वारकामध्ये बुधवारपासूनच चक्रीवादळाचा परिणाम दिसून येतोय. गुरुवारी सकाळी समुद्रात जोरदार वाऱ्यामुळे उंच लाटा उसळताना दिसत होत्या. वादळाच्या पार्श्वभूमीवर द्वारकाधीश मंदिर बंद करण्यात आले असुन किनारपट्टी भागातील लोकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. वादळ आल्यानंतर समुद्रात उंच लाटा उसळू शकतात, त्यामुळे रहिवासी भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासन जनतेला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे सरकारने जाहीर केलंय.

बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका पाकिस्तानलाही आहे. हे वादळ गुरुवारी सकाळी ११ वाजता, सिंधमधील केटी बंदरला धडकणार आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर पाक सरकारने या भागात राहणाऱ्या ६६००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सर्व मदत आणि बचाव कार्य संस्थांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. वादळ केटीबंदरला धडकत असताना १५० ते १६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा