दाभोलकर हत्याप्रकरणी आरोप निश्चित, पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी

पुणे, १६ सप्टेंबर २०२१ : २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, आज सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नवंदर (यूपीए प्रकरणाचे विशेष न्यायाधीश) यांनी पाच जणांवर आरोप निश्चित केले. मात्र आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयात सांगितले. आरोप निश्चितीमुळे खटल्यातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले. दरम्यान न्यायालयात न्यायाधीश एस. आर. नवंदर यांनी आरोपी- वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना विचारले की, तुम्हाला गुन्हा मान्य आहे का? सर्वांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं.

या प्रकरणाची सुनावणी बुधवारी (१५ सप्टेंबर) दूरदृश्य सुविधेद्वारे (व्हिडीओ कॉन्फरसिंग) झाली. व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून तावडे, काळस्कर आणि अंदुरेने वकिलांशी चर्चा करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. ही मागणी न्यायालयाने फेटाळली. इतर दोन आरोपी पुनाळेकर आणि भावे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. आरोपी डॉ. तावडे येरवडा कारागृहातून, कळसकर ऑर्थर रोड कारागृहातून, अंदुरे औरंगाबाद कारागृहातून सुनावणीस हजर झाले. आरोपी भावे, अ‍ॅड. पुनाळेकर यांना जामीन मंजूर करण्यात आला असून, ते न्यायालयात हजर होते.

तावडे, अंदुरे, काळस्कर आणि भावे यांच्यावर न्यायालयाने भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले. पुनाळेकर विरोधात आयपीसी कलम २०१ (पुरावे नष्ट करणे किंवा खोट्या सूचना देणे) अंतर्गत आरोप निश्चित केला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा