शिक्षण महागले! दहावी-बारावी परीक्षा शुल्कात मोठी वाढ, पालकांचे कंबरडे मोडले!

आधीच महागाईने पिचलेल्या पालकांसाठी आता शिक्षण मंडळाचा नवा ‘शॉक’! राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ केली आहे.

ही वाढ केवळ परीक्षा शुल्कापुरती मर्यादित नसून, प्रशासकीय, गुणपत्रिका, प्रमाणपत्र, प्रात्यक्षिक आणि माहिती तंत्रज्ञान अशा अनेक शुल्कांना लागू झाली आहे. यामुळे त्रस्त पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मंडळाने सलग चौथ्या वर्षी परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. यंदा ५० रुपयांपर्यंत शुल्क वाढले आहे. दहावीचे शुल्क ४२० रुपयांवरून ४७० तर बारावीचे शुल्क ४९० रुपयांवरून ५२० रुपये झाले आहे. याशिवाय,२० रुपये प्रशासकीय, २० रुपये गुणपत्रिका, २० रुपये प्रमाणपत्र, तसेच प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रतिविषय १५ ते ३० रुपये आणि माहिती तंत्रज्ञान विषयासाठी २०० रुपये शुल्क अतिरिक्त आकारले जात आहे.

मंडळाने छपाई, स्टेशनरी दर आणि विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे ही शुल्कवाढ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. कागदाच्या वाढलेल्या किमती हेही यामागील एक कारण आहे.

उत्पन्नात घट असताना शिक्षण आणि परीक्षा शुल्कात वाढ झाल्याने पालक आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने शुल्कवाढ रद्द करण्याच्या घोषणा केल्या असल्या तरी, त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

आस्मानी संकटानंतर या वाढलेल्या शुल्काचा बोजा पालकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त विद्यार्थ्यांनी माहिती पुरविल्यास त्यांचे शुल्क परत केले जाईल, असे प्राचार्यांनी स्पष्ट केले आहे. परीक्षा शुल्कातील ही वाढ म्हणजे पालकांच्या खिशाला मोठी झळ आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे