दुबई २६ ऑगस्ट २०२४ : दुबईत भारतीय संस्कृती आणि परंपरांचा उत्सव असलेल्या प्रथा दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ८०० हून अधिक भारतीयांनी या महोत्सवात उत्साहाने सहभाग नोंदवला. श्री.सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रथाने आयोजित केलेला हा कार्यक्रम, ग्लेनडेल इंटरनॅशनल स्कूल, दुबई येथे पार पडला. या दहीहंडीने यूएईमधील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक नवा मानदंड प्रस्थापित केल्याचं पहायला मिळालं.
यूएईमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी भारतीय परंपरा जिवंत ठेवणारे अनेक उपक्रम साजरे होतात. त्यातील एक म्हणजे श्रीकृष्ण जन्म आणि दहीहंडी फोडण्याचा उत्सव. प्रथाच्या दहीहंडीत मुलांनी हंडी फोडण्यासाठी उत्साहाने भगवान कृष्णाच्या खेळकर भावनेचे प्रतीक असणारे मानवी पिरॅमिड तयार केले. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती, जिथे राधा आणि कृष्णाच्या वेशभूषेतील मुलांनी त्यांच्या आकर्षक पोशाखांचे प्रदर्शन केले.
UAE मधील मुलांसाठी भारतीय परंपरा आणि संस्कृतीवर भर देणारे कार्यक्रम जास्तीत जास्त व्हावे, अशी इच्छा भारतीय पालकांनी व्यक्त केली. सांस्कृतिक फोटोबूथ, मटकी कलरिंग ॲक्टिव्हिटी यामुळे उत्साहात आणखी भर पडली, त्यामुळे सर्व उपस्थितांसाठी हा दिवस मजेशीर बनला.
या कार्यक्रमाला श्री. सुशील दादा मोझर, रक्षक प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात श्री. याकूब अल अली, श्री. अहमद अल अवधी रुकनी, श्री. गिरीश पंत, सौ. विना उत्तमचंदानी, सौ. सोनाक्षी, सौ. सायली थत्ते, श्री.सागर जाधव, सौ. मीनल दलाल. यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिखा भाटिया यांनी केले.
श्री.सागर पाटील हे दुबईतील प्रथा आणि त्रिविक्रम ढोल ताशा पथक दुबईचे संस्थापक असून त्यांनी या ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याची आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केलीय. UAE मध्ये या कार्यक्रमाचे यश हे प्रथाच्या प्रदेशातील कुटुंबांसाठी अर्थपूर्ण सांस्कृतिक अनुभव निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा पुरावा आहे.
प्रथा दहीहंडी उत्सव टीम सदस्य प्रियांका पाटील, श्रद्धा पाटील, सिद्धेश पाटील, भूषण तिगोटे, समीर बोंडकर, जितेश जाधव, सिद्धांत शिंदे, शरत गौड, सतीश पेडणेकर, वैभव शेटे, तुषार पिपारे, संकेत काळे, अक्षय पाटील, अंकिता पाटील, हर्षला देसाई, प्राजक्ता सावंत, आणि प्रियांका शेवाळे यांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाला.
प्रथा दहीहंडी उत्सव हा केवळ एक कार्यक्रम नव्हता; हा संस्कृती, समुदाय आणि पुढच्या पिढीला परंपरांचे महत्त्व सांगणारा उत्सव होता. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि सकारात्मक अभिप्रायासह, प्रथा भारतीय संस्कृतीला UAE मधील मुलांच्या आणि कुटुंबांच्या हृदयाच्या जवळ आणण्याचे आपले ध्येय पुढे चालू ठेवण्यास तत्पर असल्याचं आयोजक सागर पाटील यांनी सांगितलं.
न्युज अनकट प्रतिनीधी : वैभव वाईकर