पुणे, ७ सप्टेंबर २०२३ : राज्यभरातून गोविंदाचा उत्साह पाहायला
मिळत असताना पुण्यातून एक माहिती समोर येत आहे. पांगळु आळी येथे श्रीकृष्ण मंडळाच्या दहीहंडीसाठी साउंडसिस्टीम लावत असताना, दुचाकीचा धक्का लागून साउंड उभारण्याचा स्टेज कोसळल्याचा प्रकार गुरूवारी दुपारी घडला. या घटनेत दोन महिलांसह तिघेजण किरकोळ जखमी झाले. शहरातील मध्यभागात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पांगुळ आळीतील श्रीकृष्ण मंडळाचा दहीहंडी उत्सव हा आकर्षणाचा विषय असतो.
श्री कृष्ण जन्माष्ठमीचा उत्सव साजऱ्या करण्यासाठी तसेच डीजे तालावर ताल धरण्यासाठी, गुरूवारी दुपारी साउंडसिस्टीम लावण्यासाठी स्टेज बांधण्याचे काम सुरू होते. यावेळी लोखंडी साहित्याच्या आधारे या स्टेजची उभारणी करत असताना, अचानक या स्टेजला एका दुचाकीचा जोरदार धक्का बसला. यावेळी साउंडच्या स्टेजसह साउंड खाली कोसळले. यावेळी झालेल्या किरकोळ अपघातात दोन महिलांसह तिघेजण किरकोळ जखमी झाले.
जखमींना तात्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : सिद्धेश शिगवण