बिजवडी, दि.१३ मे २०२० : बारामती, इंदापूर तालुक्यातील कळाशी, गंगावळण, वरकुटे बु.,लोणी देवकर आणि न्हावी
परिसरात रविवारी (दि. १०) रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या
पावसामुळे शेकडो एकर जमिनीवरील शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले.
यामध्ये प्रामुख्याने उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील केळीच्या बागा डाळिंब,
द्राक्ष तसेच काही ठिकाणी पपई आणि ऊस त्याचबरोबर कडवळ देखील जमीनदोस्त
झाल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
सध्या कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून खराब
होऊ लागला आहे. दुसरीकडे अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकरी वर्ग
कमालीचा हवालदिल झाला आहे. रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे
कळाशी येथील शेतकरी पोपट कांबळे यांची पाच एकर क्षेत्रातील केळीची बाग
अक्षरश: जमीनदोस्त झाली.
लाखो रुपये खर्चून केळीची रोपे आणि ड्रिपची
व्यवस्था आणि त्यासाठी लागणारी औषधे यावर लाखोंचा खर्च करून ही बाग
त्यांनी उभा केली होती. परंतू रविवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग अक्षरश: जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे . झालेल्या
नुकसानीबाबत यांनी ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक याना सांगितले आहे.
आम्हाला शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून
प्रशासनाने आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी” न्युज अनकट” शी बोलताना सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव