नाशिकमध्ये महिला सुरक्षिततेसाठी ‘दामिनी मार्शल्स’, ४४ महिला पोलीस घालणार शहरात गस्त

नाशिक, १६ ऑगस्ट २०२३ : शहरातील तरुणी, महिलांची छेडछाड रोखण्यासोबतच अल्पवयीन बेपत्ता मुला-मुलींच्या शोधासाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथकांच्या जोडीला दामिनी मार्शल्स पथक तैनात राहणार आहे. या पथकात ११ दुचाकीवरून ४४ महिला पोलीस शहरात गस्त घालणार आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या पथकांचे उद्धाटन करण्यात आले. पोलीस आयुक्तालय हद्दीतील महिला अत्याचार, गुन्हे नियंत्रित करण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून दामिनी मार्शल्स पथक कार्यान्वित झाले आहे.

यावेळी उपआयुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, किरणकुमार, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त सीताराम कोल्हे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. निर्भया पथकांकडे अल्पवयीन बेपत्ता मुला-मुलींच्या शोध, समुपदेशनासह काही प्रमाणात गुन्हे शोधाचाही जबाबदारी आहे. त्यामुळे निर्भयासह दामिनी मार्शल्स पथकांना स्वतंत्र गणवेश देण्यात आले. निर्भया पथके चारचाकीतून तर दामिनी मार्शल्स या दुचाकीवरून गस्त घालतील. दामिनी पथकात फक्त महिला अंमलदार आहेत.

दामिनी मार्शल्स पथकांमार्फत महिला, तरुणींची छेडछाड होणाऱ्या ठिकाणांवर गस्त घातली जाणार, शैक्षणिक संस्था, बसस्थानक, बाजारपेठ, वसतिगृह, मल्टीप्लेक्स आणि उद्यानांतही पथकांमार्फत नियमित गस्त राहिल. टवाळखोरांना शोध घेत त्यांचे चित्रीकरण करुन कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार स्थानिक पोलीस व नियंत्रण कक्षाचीही मदत घेतली जाणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा