Dapodi-Phugewadi Traffic Signal Issue: दापोडी आणि फुगेवाडी उड्डाणपुलाजवळील वाहतूक सिग्नल वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. अवघ्या 16 सेकंदांच्या ग्रीन सिग्नलमुळे वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधत आम आदमी पार्टीने (AAP) भोसरी वाहतूक विभागाकडे सिग्नलची वेळ वाढवण्याची मागणी केली आहे.
पिंपरी-पुणे मार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी केवळ 16 सेकंदांचा ग्रीन सिग्नल मिळतो, तर पुण्याहून येणाऱ्या वाहनांना 5 सेकंद लागतात. त्यामुळे दापोडी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव आणि सांगवी भागातून येणाऱ्या वाहनचालकांना मोठा विलंब होतो. पुलावरील वाहनांना तर फक्त 10 सेकंद मिळतात, ज्यामुळे पिंपरी किंवा पुण्याकडे जाणे अशक्य होते. परिणामी, वाहनचालकांना सुमारे 116 सेकंद एकाच जागी थांबावे लागते.
“हे 16 सेकंदांचे गणित वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सिग्नलची वेळ 30 सेकंद करावी,” अशी मागणी ‘आप’चे पिंपरी-चिंचवड शहर माहिती अधिकार आघाडीचे अध्यक्ष यल्लापा वालदोर यांनी केली आहे.
भोसरी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक दीपक साळुंखे यांनी या समस्येची दखल घेतली असून, लवकरच सिग्नलची वेळ बदलून वाहनचालकांची समस्या सोडवली जाईल, असे आश्वासन दिले आहे. आता या आश्वासनावर किती लवकर अंमलबजावणी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे