नियमित दारूच्या व्यसनामुळे शरीरातील जवळ-जवळ सर्व क्रियांवरती लक्ष ठेवण्याची महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या यकृतावर विपरीत परिणाम होत आहे, असे वोक्हार्ट हॉस्पिटलने निदर्शनास आणले आहे.
दारूचा आजार हा मधुमेहाप्रमाणेच जन्मभराचा असतो. तो शारीरिक, मानसिक, बौद्धिक, नैतिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय पातळीवर फक्त आणि फक्त बरबादीच करतो.
नियमित दारूच्या व्यसनामुळे शरीरातील जवळ-जवळ सर्व क्रियांवर लक्ष ठेवण्याची महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या यकृतावर विपरीत परिणाम होत आहे असे वोक्हार्ट हॉस्पिटलने निदर्शनास आणले आहे. यकृत हा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे.
तो खनिजं, जीवनसत्त्वं साठवून ठेवतो आणि शरीरातील ८० टक्के चांगल्या कोलॅस्टेरॉलची निर्मिती करतो.
यकृतामध्ये पित्त या घटकाची निर्मिती होते. पित्तामुळे शरीरातील मेदाचं पचन होते. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे नवी मुंबईत यकृताच्या आजारांमध्ये वाढ असल्याचे दिसून आले आहे.
वाशी येथील स्टलिर्ंग वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे नुकतेच मोफत यकृत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात आलेल्या नवी मुंबईतील ५१ नागरिकांपैकी २० नागरिकांना यकृतातील मेदाचा (फॅटी लिव्हरचा) त्रास जडलेला असल्याचे आढळून आला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि हेपेटोलॉजी सल्लागार डॉ. अमित गुप्ते म्हणाले, “कामाचा ताण, अवेळी खाणे – पिणे, एकाच ठिकाणी बसून काम करणे, आर्थिक अडचणी, मानसिक ताण, नियमित दारूचे व्यसन या सगळ्यांचा परिणाम म्हणजे वाढत जाणारा लठ्ठपणा. लठ्ठपणा वाढल्याने शरीरातील मेदाचे प्रमाण वाढते. यकृतातील मेदाचेही प्रमाण वाढल्याने कार्यक्षमता कमी होऊन ते कठीण होत जाते म्हणजेच त्याचे कार्य थांबते.
आजमितीला भारतामध्ये १०० पैकी २० ते ३० जणांना यकृतातील मेद वाढीचा आजार जडलेला आहे. वेळीच उपचार केल्यास आजार बरा होऊ शकतो पण, निदान झाले नसल्यामुळे याची जाणीव अनेकांना नसते. भरपूर दारू पिणाऱ्यांच्या यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशांना अल्कोहोलिक हेपॅटिटिस, मेदयुक्त यकृत आणि अल्कोहोलिक सिरॉसिस (यकृत काठीण्य) हे आजार जडू शकतात.”
सध्याची कुटुंब व्यवस्था ही स्वतंत्र असून आधुनिक मम्मी डॅडीना मुलांना वेळ देता येत नाही. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे कुटुंबांचा धाक असणं हा प्रकार आता पाहायला मिळत नाही. त्यामुळे आजच्या युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे फार अवघड आहे. वाईन शॉपच्या बाहेर असणारी आजच्या युवा वर्गाची गर्दी पाहता भविष्यात भारतामध्ये यकृताच्या आजारांमध्ये नक्की वाढ होणार असे तज्ञ डॉक्टरांचे मत आहे .
यकृताचा कर्करोग आणि सायरोसिसमुळे भारतामध्ये तब्बल तीन लाखावर व्यक्ती दगावतात. तर दरवर्षी दोन लाख यकृताने आजारी व्यक्तींना अखेरच्या क्षणी निदान होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मृत्यूच्या कारणांमध्ये यकृताचा आजार हे तिसरे कारण ठरत आहे.