दसरा करू साजरा , लावूनी रोप आपट्याचे

अपट्याची पाने


आपटा ही एक अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती असून या झाडाची पाने, शेंगांच्या बिया, फुले, साल औषध म्हणून वापरली जाते. आपट्याच्या सालीपासून दोरखंडही बनवले जातात. तसेच आपट्याच्या झाडापासून डिंकही मिळतो. आपट्याला ‘अश्मंतक’ म्हणूनही ओळखले जाते. ‘अश्मंतक’ म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. अशा या आपट्याची मुळे जमिनीत खोलवर रुजतात. ही मुळे खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक फुटतात. त्यामुळे खडकाळ, उघड्या टेकड्यांवर हमखास आपट्याच्या झाडाची लागवड केली जाते. तसेच ‘अश्मंतक’ याचा दुसरा अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा. धन्वंतरीने ‘निघण्टू’मध्ये आपट्याच्या झाडाचे आणखी औषधी उपयोग विशद केले आहेत.

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण । इष्टानां दर्शनं देही कुरू शत्रुविनाशनम् ॥


या श्लोकानुसार, आपट्याचे झाड हे महावृक्ष असून ते अनेक महादोषांच्या निवारणाचे काम करते. इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो.


आपट्याच्या पाने ही पित्त-कफदोषावर गुणकारी आहेत.
म्हणजेच आपट्याची पाने ही पित्त आणि कफदोषांवर गुणकारी आहेत. दाह, तृष्णा आणि प्रमेह यांच्यावर विजय मिळण्यासाठी आपट्याची पाने उपयोगी ठरतात.
ही पाने लघवीवरील जळजळीवर रामबाण उपाय आहेत.लघवीच्या वेळी खूप जळजळ होत असल्यास आपट्याच्या पानांचा चांगला परिणाम दिसून येतो. आपट्याची पाने शुष्क असल्यामुळे त्यांचा रस निघत नाही म्हणून ही पाने पाण्यात भिजवून ठेवतात व नंतर ती पाने वाटून घेतली जातात. यानंतर यामध्ये रसामध्ये दूध व साखर टाकून याचा काढा बनवला जातो आणि दिवसातून तीन चार वेळा हा पिण्यास दिला जातो यामुळे लघवीच्या वेळी होणारी जळजळ थांबण्यास मदत होते.


आपट्याच्या पानाचा अणखीन एक उपयोग म्हणजे हे जखमेवर खुप गुणकारी असते. त्वचेवर जखम झाल्यास, व्रण उठल्यास त्यावर आपट्याची साल बांधण्याचा सल्लाही आयुर्वेदिक डॉक्टरांकडून दिला जातो. केवळ आपट्याची पानेच नाही, तर आपट्याच्या बियाही तितक्याच उपयोगी आहेत. या बियांचे बारीक चूर्ण करून ते चूर्ण गाईच्या तुपात घोटून त्याचे मलम तयार केले जाते व ते जखमेवर लावले जाते. ते लावल्याने व्यक्तीस बरे वाटते.
गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग झाला असल्सास आपट्याच्या सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून घेतला जातो . तो थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून त्याला गंडमाळेवर आपट्याची सालीने बांधले जाते.

जर कोणाला विंचू चावला असल्यास त्यावरून आपट्याची शाखा फिरवायला सांगितले जाते. असे केल्याने विंचवाचे विष उतरते. पण, तरीही अशा घटनांमध्ये इस्पितळ गाठणे केव्हाही योग्यच.आपट्याच्या मुळाची साल ही हृदयाची सूज कमी करण्यास मदत करते. आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळूम ते मिश्रण गाळून पिण्यास दिले जाते.या सर्व औषधी गुणांमुळे देखील कदाचित आपट्याच्या पानांना सोन्याचे झाड देखील म्हणत असावे. अशा या आपट्याच्या पानांना दसरा दिवशी फार मोठा मान असतो.पण हल्ली या झाडांची तोड मोठ्या प्रमाणात केली जातीय पण लागवड काही होत नाही. नवीन लागवडीच्या आभावामुळे जंगलातून ही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

त्यामुळे आपट्याच्या पानाचा तुटवडा भासत असल्यामुळे सध्या बाजारात आपट्याच्या कुळातील “कांचन”नावाच्या वनस्पतीची पाने विकली जात आहेत,आणि अज्ञानापोटी बरीच मंडळी ही पाने विकत घेतात आणि खुप मोठी सोन्याची पाने मिळाली म्हणून आनंदात असतात. ही पाने साधरणत: सारखीच दिसत असली तरी त्यात बराच फरक आहे. आपट्याची पाने कांचनाच्या पानापेक्षा लहान असून ती जाड असतत. आपट्याच्या पानाची खालची बाजू कानाच्या पाळी सारखी असतात तर कांचनाच्या पानाचा खालचा भाग हा लांबडा असतो. सदर माहितीसोबत असणा-या दोन्ही पानांचे चित्र पाहिले म्हणजे ते आपल्या लक्षात येईल.तर मग चला या दस-याला अशी गुणकारी आपट्याच्या(सोन्याच्या) पानांची माहिती मिळवूया आणि आपणही “वृक्ष साक्षर” होवू यात.

चला आणि यावर्षी आपणही एक प्रण करू या की यावर्षी आपट्याची पाने वाटण्याबरोबरच एक एक आपट्याचे रोप ही लावू आणि अशा या बहुगुणी औषधी वनस्पतीच्या झाडाचे संवर्धन करू या. आपणा सर्वांना येणा-या विजयादशमीच्या म्हणजेच दस-याच्या न्यूज अनकट परिवारातर्फे मंगलमय शुभेच्छा.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा