गुळुंचे ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यास जिल्हा परिषदेची तारीख पे तारीख

नीरा, २५ डिसेंबर २०२०: गुळुंचे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत अतिक्रमण तसेच अनागोंदी कारभाराच्या विरोधात ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९(१) प्रमाणे दाखल विवाद प्रकरण जिल्हा परिषदेत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे कायद्याप्रमाणे एक महिन्यात प्रकरण निकाली काढण्याचे बंधन असताना तब्बल बारा महिने होत आले असून जिल्हा परिषदेने तारीख पे तारीख देत प्रत्यक्षात मात्र ग्रामपंचायत सदस्यांना अभय दिले असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात काळेबेरे असण्याची शक्यता वर्तबिली जात असून या प्रकरणातील जबाबदार सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे.

या विवाद प्रकरणात पहिल्यापासूनच नवीन गोष्टी समोर आल्या. प्रथम चौकशीसाठी नेमलेल्या भोरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी अतिक्रमण नसल्याचा अहवाल तयार करत थेट त्रयस्थ व्यक्तींची पंचवीस गुंठे जागा सरपंचाच्या मालकीची दाखविली. यावर आक्षेप घेतल्यानंतर जिल्हा परिषदेत झालेल्या सुनावणी दरम्यान, तक्रारदारांच्या अठ्ठावीस मुद्द्यात तथ्य असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे तक्रारदारांनी मांडलेले मुद्दे ग्रामपंचायत ने दिलेला जबाब यात फारशी तफावत नाही. त्यामुळे प्रकरण ओपन अँड शट केस झाली असतानाही पुन्हा जिल्हा परिषदेने वेळकाढूपणाचे धोरण राबवत पुरंदरच्या विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक केली.

यात संबंधित अधिकाऱ्याने नव्याने झालेल्या अतिक्रमनांची मोजणी केली नाही, तसेच वाणिज्यिक अतिक्रमणे दिसत असूनही नोंदवली नाहीत. गेल्या दोन वर्षात नव्याने अनेक अतिक्रमणे झाली असून त्याचे पुरावे उपलब्ध असतानाही याकडे डोळेझाक करण्यात आली. या चौकशीत नवीन पंचायत गठीत झाल्यापासून पंचेचाळीस दिवसांच्या आत एकही समिती स्थापन करण्यात आली नाही तसेच भक्त निवास व अस्मिता भवनाचे बांधकाम विनापरवाना केल्याचे तसेच कागदपत्रे ग्रामपंचायत दप्तरी उपलब्ध नसल्याचे विस्तार अधिकारी यांच्या अहवालावरून सिद्ध झाले आहे. सगळे मुद्दे स्पष्ट दिसत असूनही जिल्हा परिषद वेळकाढूपणा करत असल्याने ग्रामपंचायतला मात्र वेळ मिळत आहे.

“गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकरण जिल्हा परिषदेत असून यासाठी प्रथम आम्ही वकिलांमार्फत आमची बाजू मांडली. पुन्हा त्यावर सूनवण्या घेतल्या. त्यावेळी सगळे मुद्दे क्लियर झाले असतानाही केवळ ग्रामपंचायतला वाचविण्यासाठी जिल्हा परिषद मदत करत आहे असे वाटते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहे.” – नितीन निगडे, तक्रारदार, गुळुंचे.

न्यूज अन कट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा