D-कंपनीवर मोठी कारवाई, दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीकडून अटक

मुंबई, 19 फेब्रुवारी 2022: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीने अटक केलीय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आलीय. सध्या न्यायालयाने कासकरची सात दिवसांची कोठडी ईडीकडं सोपवली आहे. डी कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाची मोठी कारवाई म्हणून याकडं पाहिलं जात आहे. वास्तविक, ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने ठाणे न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ताब्यात घेण्याची मागणी केली होती. दाऊद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांच्या तपासासाठी असं करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं.

ही याचिका ठाणे न्यायालयाने मान्य केली आहे. त्यानंतर ठाणे कारागृहातून कासकरची कस्टडी घेण्यात आली. त्यानंतर त्याला मुंबईतील पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आलं. येथून ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कोठडीची मागणी केली, ती मंजूर करण्यात आली. इक्बालला अटक केल्यानंतर ईडी त्याच्यासोबत जेजे हॉस्पिटलमध्ये गेली. तेथे तपासणी केल्यानंतर त्याला आता पीएमएलए न्यायालयात नेण्यात आलं.

इक्बाल कासकर तुरुंगात

2017 मध्ये तीन गुन्हे दाखल असल्याने कासकर सध्या तुरुंगात आहे. ही प्रकरणं खंडणीशी संबंधित आहेत. यामध्ये कासकरवर मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act) लावण्यात आलाय. इक्बाल कासकरवर त्याचा भाऊ दाऊदसह गँगच्या (डी कंपनी) कारवाया चालवल्याचा आरोप आहे. मुंबईतील डी कंपनीचे अवैध धंदे कासकर पाहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दाऊद इब्राहिमची गँग डी कंपनी भारतात सक्रिय असून येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचत असल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या. कराचीमध्ये लपलेला दाऊद त्याचा साथीदार छोटा शकील आणि दुसरा भाऊ अनीस इब्राहिम यांच्या मदतीनं मुंबई आणि परिसरात हवाला, बेकायदेशीर सट्टेबाजी, रिअल इस्टेटचा व्यवसाय करत असल्याचंही उघड झालं आहे. त्या खंडणीच्या प्रकरणांमध्ये टोळीचं नावही पुढं आलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा