दिल्लीत कृषी आंदोलनात एका शेतकऱ्याचा मृत्यू…

नवी दिल्ली, ८ डिसेंबर २०२०: कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांची निदर्शनं सुरू आहेत. थंडीच्या काळातही आंदोलन करणारे शेतकरी दिल्ली सीमेवर आहेत. सोनीपतच्या सिंधू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी चळवळीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतकरी आंदोलनात टीडीआय सिटीसमोर शेतकरी मरण पावला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहचून शेतकर्‍याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.

मृत शेतकऱ्याचं नाव अजय असून त्याचं वय ३२ वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. तो सोनीपतमधील बडोद्याचा रहिवासी आहे. अजय एक एकर शेतीचा मालक होता आणि जमीन करारावर घेऊन शेतीची कामं करीत असे. त्यानं या शेतकरी आंदोलनात भाग घेतला होता. रात्री झोपल्यानंतर सकाळी तो उठला नाही. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो मृत अवस्थेत आढळला. रात्री थंडी वाजल्यामुळं त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

तीन कृषी कायद्यासह अनेक मागण्यांमुळं शेतकरी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीतील वेगवेगळ्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. हजारो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरमध्ये रात्र घालवत आहेत. कडाक्याची थंडी असूनदेखील शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन कायम ठेवलं आहे. सिंधू, टिकरी, गाझीपूर आणि चिल्ला सीमेवरील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून त्यांना विरोधकांकडूनही पाठिंबा मिळत आहे.

कृषी कायद्यावरील विरोध कमी करण्यासाठी सरकार आणि शेतकरी यांच्यात पाच वेळा चर्चा झाल्या आहेत, परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आज शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदचा संमिश्र परिणाम दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी विरोधक जबरदस्त निषेध करीत आहेत, तर अनेक ठिकाणी दुकानं खुली आहेत. राज्यातही या बंदला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

उद्या होणार पुन्हा चर्चा

उद्या शेतकरी आणि सरकार यांच्यात पुन्हा संवाद होईल. यापूर्वी शेतकरी नेते आपली पुढची रणनीती तयार करत आहेत. कृषी कायदा मागं घेईपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा