डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण

पुणे, २ जानेवारी २०२२ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ बुधवारी ४ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शाळेच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर आणि ज्येष्ठ माजी विद्यार्थी प्रभाकर भावे यांची उपस्थिती राहणार असून उद्योजिका स्मिता घैसास कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असल्याचे साठे यांनी सांगितले.

मुख्याध्यापिका कल्पना वाघ म्हणाल्या की, ‘सर्व २२ वर्गांमध्ये स्मार्ट टीव्हीसह ई-लर्निंगची सुविधा, कायम स्वरूपी विज्ञान प्रदर्शन, संगीत, चित्रकला, मातीकाम यासाठी सुसज्ज वर्ग, ५० संगणकासह सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालयाचे अधुनिकीकरण, शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण, सौरऊर्जा प्रकल्प, ठिबक सिंचन योजना, बगिचाचे सुशोभिकरण, पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे, पाण्याच्या टाक्यांची क्षमता वाढविणे आदी योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून समाजातील दानशूर व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, नवीन मराठी शाळेची स्थापना ४ जानेवारी १८९९ मध्ये झाली. महर्षी धोंडो केशव कर्वे शाळेचे पहिले शालाप्रमुख होते. इंग्रजी संभाषण, संगणकाचे शिक्षण, मौखिक संस्कृत, गणित प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, स्वतंत्र ग्रंथालय आणि वैशिष्टयपूर्ण उपक्रमांमुळे ही मराठी माध्यमाची शाळा आपला दर्जा आणि गुणवत्ता टिकवून आहे. मराठी माध्यमाच्या शाळांतून विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत असताना या शाळेत मात्र, प्रवेशासाठी प्रतिक्षा यादी लावावी लागत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा