राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय… या तारखेला होणार परीक्षा

मुंबई, १३ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुर्वी देखील या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २३ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार राज्यसेवेची पूर्व परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी घेण्यात येणार होती. मात्र, राज्यात कोविड -१९ संकट पसरण्यास सुरुवात झाली होती. मार्च २५ पासून पूर्ण राज्यात लॉक डाऊन देखील घोषित करण्यात आले होते. या दरम्यान सर्व शैक्षणिक संस्था व दळणवळण व्यवस्था बंद असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुन्हा एक नवीन पत्रक काढण्यात आले. १७ जूनच्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रलंबित परीक्षा १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु यावेळी देखील कोविड -१९ संकट कायम असल्याने तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा ही पूर्ण देशभरात घेतली जाते त्या अनुषंगाने अर्थात या राज्यात देखील होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा या दोन्ही एकाच दिवशी घेणे शक्य नाही. उपकेंद्रांची उपलब्द्धता व इतर प्रशासकीय अडचणीमुळे या दोन्ही परीक्षा राज्यांमध्ये एकाच दिवशी घेणे शक्य होणार नाही, त्या कारणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवेची पूर्वपरीक्षापुढे ढकलण्यात आली असून आता ती २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

आयोगामार्फत आयोजित विषयांकित परीक्षेकरीता उमेदवारांची संख्या तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरीता प्रवेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही परीक्षांचे एकाच दिवशी आयोजन करण्यास परीक्षा उपकेंद्राच्या उपलब्धतेसह अन्य प्रशासकीय अडचणी निर्माण होत होती. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही देशपातळीवर घेण्यात येणार आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ह्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा