‘शाळा सुरू करण्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय’ – बच्चू कडू

9
नागपूर, ३ सप्टेंबर २०२१: नुकत्याच दिल्लीमध्ये शाळा सुरू करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही राज्यात शाळा सुरू झालेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबाबत एक तारीख जाहीर केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला स्थगिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले होते की टास्कफॉर्स सोबत चर्चा केल्यानंतरच जो काही निर्णय आहे तो घेतला जाईल. त्यामुळे शाळा पुन्हा लांबणीवर गेल्या होत्या. पण आता याबाबत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे. राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
गुरूवारी नागपुरात विमानतळावर आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मंत्री बच्चू कडू म्हणाले की, शाळा दिवाळीनंतर सुरू करायची की आत्ता सुरू करायची यासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. त्यासाठी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्ससोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू झाली पाहिजे, असे सर्वांना वाटत आहे. पण, केरळनंतर महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका आहे, यामुळे कुठलाही निर्णय घेताना सर्व बाबी लक्षात घ्यावा लागणार आहेत असे देखील बच्चू कडू यांनी सांगितले.
राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार होती, पण टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याला स्थगिती देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या काही भागांमध्ये एकदम कमी आहे, पण अजूनही काही जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती पाहता धोका कमी झाला नाही, असे ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा