मुंबईत दहशतवादी मेमनच्या कबरीवर सजावट ?

मुंबई, ८ सप्टेंबर २०२२ : १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकुब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता. पण आता याच ठिकाणी त्याच्या कबरीवर एलईडी लायटिंग, संगमरवरच्या फरशा लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. कब्रस्तानमधील व्हिडीओ समोर आला असून त्यात, दहशतवादी याकुब मेमन याच्या कबरीवर संगमरवर फरशी, लायटिंग लावण्यात आल्याचे दिसत आहे.

कब्रस्तानमधील वीज जोडणीद्वारे कबरीवर लावण्यात आलेल्या लाइट्सला वीजपुरवठा केला जात आहे. इतकेच नव्हे तर या ठिकाणी पहारा देण्यासाठी काही व्यक्ती असल्याचेही दिसून येत आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात कित्येक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर २०१५ साली त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. आता त्याच्या कबरीला संगमरवरी फरश्या लावण्यात आल्या असून एलईडी बल्ब लावण्यात आल्याची माहिती आहे. रक्तपात घडवून कित्येक निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या मेमनचे उदात्तीकरण करण्यात येतंय का? असा प्रश्न निर्माण होत असून अनेक नेत्यांकडून याबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणाचं उत्तर द्यावं लागेल असं वक्तव्य भाजपच्या राम शिंदे यानी केल आहे तर आमदार नितेश राणे बोलतात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि ताबडतोब कारवाईची मागणीही केली आहे.या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. तर मुंबईतील बडा कब्रस्तानचे कर्मचारी याच्याकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. शब ए बारातला या दफनभूमीला रोषणाई करण्यात आली आहे. तर सध्या जो फोटो व्हायरल होत आहे तो जुना असल्याची माहिती कर्मचारी देत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा