आर्चरी वर्ल्डकप मध्ये भारताला चौथे गोल्ड, दीपिका कुमारीनं दिले एका दिवसात देशाला ३ सुवर्ण पदक

पॅरिस, २८ जून २०२१: पॅरिसमधील तिरंदाजीच्या विश्वचषक (आर्चरी वर्ल्डकप) टप्प्यातील ३ स्पर्धेत रविवारी भारतानं ३ सुवर्ण पदकं जिंकली. या स्पर्धेत आतापर्यंत देशाला ४ सुवर्णपदकं मिळाली आहेत. दीपिका कुमारीनं एका दिवसात देशाला ३ सुवर्ण पदक मिळवून दिले. प्रथम, तिनं पती अतनु दाससमवेत मिक्स्ड इवेंट मध्ये गोल्डला लक्ष्य केलं. या पती-पत्नी जोडीनं आधीच ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविलीय. या दोघांकडूनही पदकांची अपेक्षा आहे.

यानंतर दीपिकाच्या नेतृत्वात भारतीय महिला रिकर्व्ह संघानं सुवर्ण जिंकलं. संघात भारतानं मेक्सिकोला ५-१ असं पराभूत केलं. दीपिका व्यतिरिक्त भारतीय संघात अंकिता भगत आणि कोमोलिका बारी यांचा समावेश होता.

दीपिकानं वैयक्तिक इवेंट मध्येही सुवर्ण जिंकलं

दिवसअखेर दीपिकानं वैयक्तिक स्पर्धेतही देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. यात तिनं रशियाच्या एलेना ओसीपोव्हाचा ६-० असा पराभव केला. एका दिवसात तीन सुवर्ण जिंकणारी दीपिका ऑलिम्पिकमध्येही अशीच कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. यावर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक होणार आहेत.

पती-पत्नीनं प्रथमच जोडी म्हणून सुवर्ण जिंकलं

अतनु दास आणि दीपिका कुमारी यांनी पती-पत्नी म्हणून प्रथमच एखाद्या इवेंटची अंतिम फेरी जिंकलीय. स्वत: अतनू दास यांनी ही गोष्ट सांगितली. विश्वचषकातील मिश्र स्पर्धेत या भारतीय जोडीनं नेदरलँडच्या जेफ व्हॅन डेन बर्ग आणि गॅब्रिएला स्कोलेसरचा ५-३ असा पराभव केला. सामन्याच्या एका टप्प्यावर भारतीय जोडी ०-२ ने पिछाडीवर होती. त्यानंतर दीपिका आणि अतनूने नेत्रदीपक पुनरागमन केलं आणि सुवर्ण जिंकलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा