शिवछत्रपतींच्या आठ किल्ल्यांवर दीपोत्सव उत्सव साजरा, पुण्यातील सरहद परिवाराचा उपक्रम

पुणे, २३ ऑक्टोबर २०२२ : पुण्यातील सरहद परिवाराने, शिवछत्रपतींनी मराठा स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाची जाण ठेवत, गेल्या बारा वर्षापासून सातत्याने, राजगडावर दिवाळीचा पहिला दिवा किल्ल्यावर लावण्याचे व्रत घेतलं आहे. गेल्या बारा वर्षांपासून छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावर पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. राजगडासह, रायरेश्वर, तिकोना, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, मल्हार या आठ गडांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला.

सरहद परिवाराचे विविध सदस्य त्या त्या गड किल्ल्याची जबाबदारी घेऊन हा उत्सव यशस्वीपणे पार पाडतात. त्यापैकी सदस्य, रायरेश्वर गडावर अनिल सोनवणे, तिकोना गडावर संदीप कदम, सिंहगडवर निलेश पवळे, शिवनेरी गडावर संदेश बारवे, पुरंदर गडावर गणेश उर्फ दत्ता चोरगे, मल्हार गडावर सागर पारखी, अजिंक्यताऱ्यावर तुषार फरांदे यांनी, तर
राजगडावरील दीपोत्सवासाठी चंद्रकांत दादा मांगडे, राजाभाऊ फरांदे, अनिल भाऊ शेळीमकर, प्रशांत दानवले पाटील यांनी दीपोत्सव पार पडला.

सर्वच गडांवर माणुसकीचा, निष्ठेचा आणि जातीधर्मांच्या पलीकडे जाऊन वैचारिक दिवा उजळण्याचा हा प्रयत्न होता. बारा वर्षापुर्वी हा दीपोत्सव हा मर्यादित स्वरूपात होता, मात्र प्रसिद्धी मिळाल्याने आता दोनएकशे विद्यार्थी, विद्यार्थिनी या दीपोत्सवाला हजेरी लावत असल्याचे राजगड दीपोत्सव प्रमुख मयुर मसुरकर सांगतात.

छत्रपतींच्या आणि त्यांच्या मर्दमावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे एक नव्हे तर आठ गडकोट किल्ले दीपोत्सवाने उजळून निघाले. सरहद परिवार केवळ दीपोत्सव आयोजित करून उत्सव करत नाहीत तर गडावरील सर्व स्वच्छता करूनच ते सांगता करतात. त्यामुळे दीपोत्सवाबरोबर गडावरील स्वच्छता, पर्यावरण यांची जपणूक करत हा दीपोत्सव साजरा होतो हे विशेष. सरहद परिवाराने आयोजित केलेल्या गडकोट किल्ल्यावरील दीपोत्सवाचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा