मुंबई, १ नोव्हेंबर २०२०: अनेक वेळा अनेक दिग्गज लोकांना ट्रोल केलं जातं किंवा एखाद्या भूमिकेवरुन त्यांच्याविषयी अर्वाच्य भाषेत समाजमाध्यमांवर लिहिलं जातं. अशा घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत. विशेष करून केंद्रात भाजपचं सरकार सत्तेत आल्यापासून समाजमाध्यमांचा गैरवापर करुन विविध क्षेत्रांतील नामांकित आणि दिग्गज व्यक्तींच्या बदनामीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक वेळा अनेक दिग्गज मान्यवरांनी देखील याविरोधात आवाज उठवला आहे. महाराष्ट्रात यापुढे अशा असामाजिक तत्त्वांना पायबंद बसावा यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत”, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
“केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सोशल मीडियावरुन विशेषकरुन राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या बदनामी करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. विविध क्षेत्रातल्या नामांकित आणि दिग्गज व्यक्तींना बदनाम करण्यासाठी अनेक अॅपचा वापर करण्यात येऊ लागला आहे”, असं शेख म्हणाले.
“अनेक अॅप्सचा वापर कोणत्याही सन्माननीय व्यक्तीबद्दल बदनामी करण्यासाठी तसंच समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकुर प्रसिद्ध करताना समाज विघातक लोक दिसतात. महाराष्ट्रात यापुढे अशा असामाजिक तत्त्वांना पायबंद बसावा यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेत”, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे