दिल्ली १९ फेब्रुवारी २०२५ : दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडलं आणि नंतर लगेचचं ८ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल लागला. निवडणुकीच्या निकालातून भाजपला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याने दिल्लीत भाजप सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालं होत. निकालानंतर चर्चा होती ती मुख्यमंत्री कोण होणार याची. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नेत्यांची नाव होती. यामध्ये परवेश वर्मा यांचं नाव आघाडीवर होत याच कारण म्हणजे त्यांनी आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता.
परंतु आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी महिला विराजमान होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता आणि तो भाजपने स्वीकारला असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल ११ दिवसांनी आज संध्याकाळी ७ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या 20 फेब्रुवारीला रामलीला मैदानावर दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी पाठवलेल्या निमंत्रणात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या शपथविधीचाही उल्लेख करण्यात आला आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व केंद्रीय मंत्री, भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उद्योगपती, सिनेतारक, क्रिकेटपटू, संत, मुत्सद्दीही येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, रुचिता घोसाळकर