Pune Dehu : देहू ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा’, या अभंगांच्या सुरावटीत श्री क्षेत्र देहू येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५व्या वैकुंठगमन वर्षाची सांगता झाली. तुकाराम बीजेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी हरिनामाचा गजर केला आणि नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टीसह अबीर-बुक्का, पानफूल व तुळशीची उधळण करून तुकोबांना अभिवादन केले.
देहूत दाखल झालेल्या दिंड्यांच्या फडावर वारकरी, भाविक रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा-टाळ-मृदंगाच्या साथीत भजनासह हरिनाम संकीर्तनात दंग झाले होते. पहाटेपासूनच पांडुरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात आणि गोपाळपुरा येथील वैकुंठगमन मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती.बीज सोहळ्याला पहाटे तीनपासून काकड आरतीने सुरुवात झाली. संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे व विश्वस्तांच्या हस्ते महापूजा झाली. महापूजेनंतर भाविकांना मुख्य मंदिरात, शिळा मंदिर व वैकुंठगमन मंदिरात दर्शनाला सोडण्यात आले. नंतर पादुका भजनी मंडपात आणल्या. भाविकांनी नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली.
मंदिरासमोर मंडप, स्क्रिन;
कडक उन्हाळा असल्याने संस्थानच्या वतीने मंदिराच्या आवारात राममंदिरासमोर मंडप घालण्यात आला होता. मंदिर व नांदुरकीच्या झाडाखालील पारावर फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली होती. भाविकांना दर्शनबारीतून सोडण्यात येत होते. इंद्रायणी नदीघाट भाविकांनी फुलून गेला होता. बिजेचा सोहळा पाहता यावा, यासाठी दोन मोठ्या
स्क्रिन लावल्या होत्या.
‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’चा जयघोष करीत शिंगाडे,सनई, चौघडा अन् ताशाच्या गजरात निघाली पालखी
अवघ्या सहा दिवसांत पंढरपूर ते देहू पायी वारी श्रीक्षेत्र पंढरपूर ते देहूगावापर्यंतचे अंतर अडीचशे किलोमीटर आहे. हे अंतर अवघ्या सहा दिवसांत पार करण्यासाठी दररोज पहाटे दोन-अडीचला चालायला सुरुवात होते. तासाला विश्रांती घेत सकाळी अकरापर्यंत चालणे. अकरा ते दुपारी दोन भोजन व विश्रांती. दुपारी दोन ते सायंकाळी सात पुन्हा चालणे. सात ते नऊ भोजन व रात्रीचा मुक्काम. चालताना वारकऱ्यांचे गायन, दररोज चाळीस ते पन्नास किलोमीटर चालणे आणि सहाव्या दिवशी देहूत दाखल… अशी बीजवारी गेल्या २० वर्षांहून अधिक वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. हभप बाळकृष्णबुवा दिंडीमार्फत पंढरपूर ते देहू ही बीजवारी असते. दिंडीचे तत्कालीन चालक हभप नागनाथ महाराज उर्फ कारभारी महाराज यांनी पंढरपूर येथून देहूला दरवर्षी तुकाराम बीजेला पोहोचण्यात सातत्य ठेवले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे