दिल्ली कॅपिटल्सचा जोरदार विजय, पंजाब किंग्सला हरवून मिळवले टॉप-4 मध्ये स्थान

PBKS Vs DC, 17 मे 2022: दिल्ली कॅपिटल्स (DC) ने सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा (PBKS) पराभव करून इंडियन प्रीमियर लीग (IPL) प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 17 धावांनी जिंकला आणि गुणतालिकेत अव्वल 4 मध्ये स्थान मिळवले.

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 159 धावा केल्या होत्या, कमी धावसंख्या असल्यामुळे सामना वाचवणे दिल्लीसाठी कठीण होते, परंतु दिल्लीच्या गोलंदाजांनी धमाकेदार गोलंदाजी केली. पंजाब किंग्जला 20 षटकांत केवळ 142 धावाच करता आल्या. 17 धावांच्या या विजयासह दिल्ली कॅपिटल्सचे 14 गुण झाले आहेत.

हे आहे प्लेऑफचे गणित…

जर आपण पॉइंट टेबल आणि प्लेऑफबद्दल बोललो, तर गुजरात टायटन्स आधीच पात्र ठरले आहेत. उर्वरित तीन जागांसाठी लढत आहे, राजस्थान आणि लखनौचे 16-16 गुण आहेत, त्यामुळे या दोन संघांचे आगमन निश्चित मानले जात आहे. तर चौथ्या स्थानासाठी मुख्य लढत आरसीबी-दिल्ली यांच्यात आहे, ज्यांचे 14-14 गुण आहेत.

पंजाब किंग्जची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली

या सामन्यात पंजाब किंग्जला चांगली सुरुवात मिळाली, पण त्याचा फायदा संघाला घेता आला नाही. जॉनी बेअरस्टोने 28 धावांची जलद खेळी खेळली, तर शिखर धवननेही 19 धावा केल्या. पण 38 धावांवर पहिली विकेट पडताच विकेट्सची रांग लागली.

भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन यांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. पंजाब किंग्जकडून कोणत्याही खेळाडूने आशा उंचावल्या तर तो तरुण जितेश शर्मा होता, ज्याने 44 धावा केल्या. पण शेवटी डेव्हिड वॉर्नरच्या शानदार झेलने त्यालाही माघारी धाडलं. शेवटी राहुल चहरने काही फटके उडवण्याचा प्रयत्न केला, मात्र असे असतानाही पंजाब किंग्जला केवळ 142 धावा करता आल्या.

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीने या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली आणि कमी धावसंख्या असूनही सामना वाचवला. अक्षर पटेलने 4 षटकात केवळ 14 धावा देत 2 बळी घेतले. कुलदीप यादवने 3 षटकात केवळ 14 धावा दिल्या आणि 2 महत्त्वाचे बळी घेतले. त्याचवेळी शार्दुल ठाकूरनेही या सामन्यात 4 बळी घेत पंजाब किंग्जच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

दिल्ली कॅपिटल्ससाठी मिचेल मार्श पुन्हा चमकला

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली, कारण डेव्हिड वॉर्नर सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. वॉर्नर बाद झाल्यानंतर सर्फराज खान आणि मिचेल मार्श यांनी डावाची धुरा सांभाळली आणि धुवांधार खेळी खेळली. दिल्लीकडून मिचेल मार्शने पुन्हा एकदा धमाका केला आणि 48 चेंडूत 63 धावा केल्या. यादरम्यान मार्शने 4 चौकार, 3 षटकार लगावले.

मिचेल मार्शने प्रथम सरफराज खानसोबत 51 धावांची आणि नंतर ललित यादवसोबत 47 धावांची भागीदारी केली. ललित यादवला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले, त्याचा फायदा घेत त्याने 24 धावा केल्या. मात्र, त्याच्याशिवाय कोणीही मोठी धावसंख्या करू शकले नाही आणि मधल्या फळीतील फलंदाज झटपट माघारी परतले. या महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 159 धावा केल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा