नवी दिल्ली, १७ जुलै २०२३ : देशाची राजधानी दिल्लीत यमुना नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावर राहणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला १०,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलीय. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “यमुनेच्या काठावर राहणाऱ्या अनेक गरीब कुटुंबांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. काही कुटुंबांचे संपूर्ण घरातील सामान वाहून गेले. प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला दहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे. विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यांचे आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे वाहून गेली आहेत त्यांच्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. ज्या मुलांचे कपडे आणि पुस्तके वाहून गेली आहेत त्यांना शाळांकडून हे साहित्य दिले जाईल”.
दिल्लीतील यमुना नदीला पूर आल्याने, गेल्या एका आठवड्यापासून शहरात पाणीच पाणी झालंये. यमुना नदीचा १९७८ चा २०७.४९ मीटर जलपातळीचा विक्रम बुधवारी खंडित झाला. तिची पाण्याची पातळी २०७.७१ मीटरवर गेली आणि दिल्लीच्या अनेक प्रमुख भागात पूर आला आहे. आता यमुनेच्या पाण्याची पातळी कमी होत असून रविवारी २०५.९८ मीटर इतक्या पातळीची नोंद झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड