नवी दिल्ली २२ जून २०२३: घटनाबाह्यरीत्या दिल्ली वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा, दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने आज केला. लोकशाहीची हत्या करीत ही नेमणूक करण्यात आल्याचा दावा दिल्लीचे उर्जा मंत्री आतिशी यांनी केला. एलजींच्या निर्णयाविरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सेवानिवृत्त न्यायमूर्ती उमेश कुमार यांच्या डीईआरसी अध्यक्षपदी नियुक्तीला आतिशी यांनी घटनाबाह्य आणि हा दिल्लीकरांवरील अन्याय असल्याचे म्हटले आहे.
डीईआरसी अध्यक्षांच्या नियुक्ती मुद्द्यावर यापूर्वीच सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्लीत निवडून आलेल्या सरकारच्या सल्ल्यानुसार कामकाज करण्यास नायब राज्यपाल बाध्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बुधवारी राजस्थान उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती संगीता लोधा यांच्या नावांची शिफारस केली. परंतु एलजींनी सरकारच्या शिफारसीकडे कानाडोळा करीत दुसऱ्याचीच नियुक्ती केल्याचा आरोप आतिशी यांनी केला.
आता दिल्ली सरकार आणि एलजींमधील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. जानेवारीत केजरीवाल यांनी निवृत्त न्यायमूर्ती राजीव श्रीवास्तव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल, परंतु त्यांनी १५ जून रोजी एलजी कार्यालयाला पत्र पाठवून पदभार स्वीकारण्यास नकार दिला होता.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर