आरोग्याच्या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्लीतुन प्रयत्न, विजय वडेट्टीवार यांचा दावा

गडचिरोली, १४ ऑगस्ट २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे ते साताऱ्यातील आपल्या दरे या गावी विश्रांतीसाठी गेले होते. त्यामुळे ते पुण्यातील चांदणी चौक उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. शिंदे यांच्या आजारावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. ठाण्यात मृत्यूचे तांडव सुरू असताना मुख्यमंत्री मात्र विश्रांती घेत आहेत, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणावर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळाच दावा केला आहे.

आरोग्याच्या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्लीतील हाय कमांडचा प्रयत्न असल्याचे राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला जाईल. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही खेळी असावी अशी शक्यता वडेट्टीवार यांनी यांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांचा सहभाग अत्यंत कमी होता हे निदर्शनास आणून देत सीएमओ कार्यालय आणि प्रवक्ता यांच्यात त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवरून परस्परविरोधी विधान केली जात असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्याचे कारण देत शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्ली हायकमांडचा प्रयत्न सुरू आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची खेळी निष्प्रभ करण्यासाठी अजितदादा यांना मुख्यमंत्रीपद देण्याची खेळी केली जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा