कोळसा घोटाळा प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून दर्डा पिता पुत्रांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली, २८ जुलै २०२३ : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने त्यांना बुधवारी २६ जुलै दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील गैरव्यवहारप्रकरणी ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने बुधवारी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांना चार वर्षांची, तर माजी कोळसा सचिव एच.सी.गुप्ता आणि अन्य दोन प्रशासकीय अधिकारी के.एस.क्रोफा व के.सी.समरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर आज कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे कोळसा व खाण मंत्रालयाचीही जबाबदारी होती. त्यांनी माजी खासदार दर्डा यांना कोळसा खाण वाटपासंदर्भात दिलेल्या पत्राचा दर्डा यांनी गैरवापर केला. या पत्रातील मजकुराचा चुकीचा अर्थ लावला गेला असून, त्यासंदर्भात अधिक तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. छत्तीसगडच्या कोळसा खाण वाटपासंदर्भात अन्य दोषीही तुरुंगात असून याप्रकरणी ईडीकडूनही चौकशी केली जात आहे.

छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्याशी संबंध असलेले अनेक जण रायपूर तुरुंगात कैद आहेत. यात आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा