तब्बल २२ वर्षांपासून फरार असलेल्या उर्दू हायस्कूलच्या शिक्षकाला दिल्ली स्पेशल सेलकडून अटक

भुसावळ, २३ फेब्रुवारी २०२४ : पोलीस ठाण्यात सीमी प्रकरणी २००१ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात तब्बल २२ वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला दिल्ली स्पेशल सेलच्या शस्त्रधारी पोलिसांनी काल दुपारी भुसावळातील दत्तनगर, खडका रोड भागातून अटक केल्याने भुसावळसह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. अत्यंत गोपनीयता पाळत ही कारवाई करण्यात आल्यानंतर बंदोबस्तात गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संशयिताला दिल्लीकडे दोन वाहनांद्वारे नेण्यात आले.

पोलीस ठाण्यात संशयित आरोपी हनीफ शेख मोहम्मद हनीफ यांच्या विरोधात २००१ मध्ये त्यावेळच्या सीमी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. संशयिताने २००१ मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’ चे निघणारे मासिक ‘इस्लामिक मुव्हमेंट’मध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या आरोपान्वये हा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक पवन कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या गुन्ह्यात संशयित सातत्याने गैरहजर राहिला असल्याने दिल्ली न्यायालयाने संशयिताला २००२ मध्ये फरार घोषित केल्यानंतर त्यास अटक करण्यासाठी दिल्ली दक्षिण विभाग साकेत विहारच्या स्पेशल सेलचे १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक गुरुवारी दुपारी भुसावळात धडकले. संशयिताला दुपारी राहत्या घरातून अटक करण्यात आली. यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल तौसीफ शेख यांची याकामी मदत घेण्यात आली. दिल्ली स्पेशल सेलचे निरीक्षक पवन कुमार, एसआय सुमित, एसआय नवदीप, एएसआय आस्वाद आदी १६ अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

दिल्ली स्पेशल सेलला संशयिताबाबत अत्यंत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथक भुसावळात धडकले. शिक्षकाच्या अटकेने भुसावळातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली. संशयित आरोपी मोहम्मद हनीफ याच्याविरोधात यापूर्वी भुसावळातही तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर या गुन्ह्यांमध्ये त्याची निर्दोष सुटका झाल्याचेही सांगण्यात आले. नगरपालिकेच्या उर्दू स्कूलमध्ये मोहम्मद हनीफ हे गेल्या काही वर्षांपासून शिक्षक आहेत. तर एका फाउंडेशनचे सचिव देखील असल्याचे समजते. दुपारी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले व सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय आवारात मोठी गर्दी जमली होती. यावेळी स्थानिक पोलिसांसह एटीएसचे कर्मचारी हजर होते.

न्यूज अनकट प्रतिनीधी : पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा