दिल्ली ते कोलकत्ता प्रवास आता १७ तासात होणार पूर्ण

11

नवी दिल्ली, १५ मे २०२३: राजधानी दिल्ली ते पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता या दरम्यानचा प्रवास आता आणखी रोमांचक होणार आहे. सगळं काही ठिक आणि वेळेवर पूर्ण झाले तर ‘वाराणसी एक्स्प्रेसवे’ च्या माध्यमातून दिल्ली ते कोलकत्ता हा प्रवास केवळ १७ तासांत पूर्ण करता येणार आहे. वाराणसी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवेच्या माध्यमातून वाराणसी ते कोलकत्ता हे अंतर केवळ १० तासातच पूर्ण केले जाईल.

दिल्ली ते वाराणसी या प्रवासाचा विचार केला तर पुर्वाचल, लखनौ-आग्रा आणि यमुना एक्स्प्रेसवेच्या माध्यमातून हा प्रवास या आधीच १० तासांत करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वाराणसी ते कोलकत्ता हा एक्स्प्रेसवेचा संपूर्ण प्रोजेक्ट तीन हजार कोटी रुपयांचा आहे. २०२६ पर्यंत हा प्रोजेक्ट पूर्णत्वास आणला जाईल. वाराणसी-कोलकत्ता एक्स्प्रेसवेच्या माध्यमातून ६९० किलोमीटरचे अंतर कमी होऊन ६१० किमी होईल आणि प्रवासाचे तास ६-७ तास पर्यत कमी होईल.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव यांच्या मार्गदर्शनाखालील बैठकीत या प्रस्तावित एक्स्प्रेसवेला २०२१ मध्ये मंजूरी मिळाली होती. या माध्यमातून मोहनिया, रोहतास, सासाराम, औरंगाबाद, रांची, रामगड, हावडा आणि इतर महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत. हा एक्स्प्रेस वे वाराणसीच्या रिंगरोड पासून सुरू होईल आणि हावडा जिल्ह्यांतील एनएच १६ ला जावून मिळेल. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा