दिल्ली युनिव्हर्सिटीचा अनोखा उपक्रम: प्रेम आणि मैत्री शिकवणारा नवा कोर्स

15
Delhi University Love and Friendship Course
प्रेम आणि मैत्री शिकवणारा नवा कोर्स;

Delhi University Love and Friendship Course: दिल्ली युनिव्हर्सिटीने तरुण पिढीच्या भावनिक आरोग्यासाठी एक अनोखा आणि सकारात्मक पाऊल उचललं आहे. २०२५-२६ शैक्षणिक सत्रापासून सुरू होणारा ‘निगोशिएटिंग इंटिमेट रिलेशनशिप्स’ हा नवा कोर्स Gen Z साठी खास डिझाइन करण्यात आला आहे. सायकॉलॉजी डिपार्टमेंटद्वारे संचालित हा चार-क्रेडिटचा कोर्स प्रेम, मैत्री, जेलसी आणि ब्रेकअप यांसारख्या भावनिक गोष्टी हाताळण्याचे कौशल्य शिकवेल. कॉलेज कॅम्पसमध्ये टॉक्सिक रिलेशनशिप्समुळे होणारा भावनिक त्रास आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या कोर्समध्ये मॉडर्न डेटिंग, डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडियाच्या प्रभावावर चर्चा होईल. विद्यार्थ्यांना रेड फ्लॅग्स ओळखणे, निरोगी संवाद साधणे आणि भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्याचे धडे मिळतील. विशेष म्हणजे, ‘कबीर सिंग’ आणि ‘टायटॅनिक’ सारख्या चित्रपटांच्या विश्लेषणातून टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी आणि आदर्शवादी प्रेम यांसारख्या थीम्सवर मोकळी चर्चा होईल. आठवड्यातून तीन लेक्चर्स आणि एक ट्यूटोरियल असलेल्या या कोर्समध्ये ग्रुप डिस्कशन, मूव्ही रिव्ह्यू आणि सोशल मीडिया विश्लेषण यांसारख्या इंटरॅक्टिव्ह अँक्टिव्हिटीजचा समावेश आहे.

हा कोर्स सर्व स्ट्रीम्सच्या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी खुला आहे, ज्यांना प्रारंभिक सायकॉलॉजीची समज आहे. डिजिटल युगात वाढत्या भावनिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हा कोर्स विद्यार्थ्यांना सक्षम करेल. प्रेम आणि मैत्रीच्या जटिल गोष्टी समजून घेऊन निरोगी नातेसंबंध जोपासण्याची कला शिकवणारा हा कोर्स तरुणांसाठी एक वरदान ठरेल. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या या नावीन्यपूर्ण पुढाकाराचे स्वागत करताना, तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या भावनिक प्रवासाला सकारात्मक दिशा द्यावी!

न्यूज अनकट प्रतिनिधी; प्रज्ञा शिंदे