नवी दिल्ली, २० नोव्हेंबर २०२०: दिल्लीमध्ये कोरोना चा कहर पुन्हा पाहण्यास मिळत आहे. खासकरून दिवाळीनंतर यामध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. दिल्लीमधील वाढतं प्रदूषण हे देखील याला कारणीभूत ठरत आहे. यानंतर केजरीवाल सरकार झपाट्यानं पावलं उचलत आहे. गेल्या २४ तासात तब्बल ७ हजार ५४६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळं दिवसभरात ९८ रुग्णांचा मृत्यू झालाय.
दिल्लीत परवा (१८ नोवेंबर) कोरोनानं सर्वाधिक १३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्याआधी १२ नोव्हेंबर रोजी १०४ रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. राजधानी दिल्लीत कोरोनामुळं आतापर्यंत ८ हजार ४१ रुग्णांचा मृत्यू झालाय. दिल्लीतील मृत्यू दर हा १.५७ टक्के इतका आहे.
दिल्लीत आतापर्यंत कोरोनाचे ५ लाख १० हजार ६३० रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४ लाख ५९ हजार ३६८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दिल्लीत ४३ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, दिल्लीत काल (१९ नोव्हेंबर) दिवसभरात ६ हजार ६८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ॲक्शन मोड मध्ये ‘आप’ सरकार
दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये केजरीवाल सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. दिल्ली सरकारनं राज्यातील ४२ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालयाच्या क्षमतेनुसार ८० टक्के आयसीयू बेड आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे