सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर २८ जानेवारी २०२४ : फर्दापूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून ३२ वर्षीय पोलीस कर्मचारी सतीश हिवाळे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे. तसे तक्रार निवेदन सिल्लोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे
सोयगांव तालुक्यातील फर्दापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सतीश नारायण हिवाळे यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत मोरे मागील अनेक महिन्यापासून मानसिक त्रास देत होते. तसेच पैशाची मागणी देखील करीत होते. पैसे दिले नाही तर तुला निलंबित करून तुझ्यावर कारवाई करेल अशा धमक्या देऊन अन्य कर्मचाऱ्यांसमोर हेतू पुरस्कारपणे अपमानित करीत होते. पोलिस निरीक्षक भरत मोरे अशी वागणूक देत असल्याने मानसिक त्रास होत असल्याचे, आत्महत्या करणाऱ्या सतीश हिवाळे यांनी आपल्या पत्नीजवळ सांगितले होते. आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी व नातेवाईक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे यांना भेटून घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे.
फर्दापूर पोलीस ठाण्याचे जबाबदार सपोनि भरत मोरेला अटक करून त्यांच्यावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात सिल्लोड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचारी सतीश हिवाळे यांच्या नातेवाईकासह समाज न्यायासाठी उपस्थित होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय चौधरी