गोल पोस्ट स्पॉटलाइट लोकशाहीर मनोहर जाधव काळाच्या पडद्याआड

लोकशाहीर मनोहर जाधव काळाच्या पडद्याआड

गंगापूर, १६ मार्च २०२३: लोककलेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे लोकशाहीर मनोहर किसनराव जाधव (वय ९०) यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना मराठवाडा भूषण पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पश्चात चार मुलं, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. शाहीर मनोहर जाधव यांनी बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करीत पाचवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.

अंगी असलेली लोककला शालेय कार्यक्रमातून प्रदर्शित करीत जाधव यांनी आपल्या लोककलेला प्रारंभ केला. लोकांची वाहवा अन् अपेक्षित बिदागी यामुळं लोककलाच आपलं जीवन आणि मरण असा निश्चय करीत जाधव यांनी आपला कलाप्रवास सुरूच ठेवला. आंबेडकरी प्रतिभेचे महाकवी वामनदादा कर्डक यांच्याशी त्यांचा परिचय झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जाधव यांच्या कलाकक्षा विकसित झाल्या. वामनदादा कर्डकांच्या कवितांचा प्रभाव जाधव यांच्या शाहिरीवर होत गेला.

त्यातूनच मग शेकडो बुद्ध-भीमगीतं, राष्ट्रीय गीतं, शेतकरी गीतं, अशा साहित्यकृती निर्माण होत गेल्या. दत्तोबा तांबे, साळी शिरोलीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, आदि तमाशा मंडळांमध्ये भक्त पुंडलिक, सावता म्हणे केला मळा, ज्ञानेश्वर माझी माउली, मुंबईचा हमाल अशा विविध नाटकांमध्ये भुमिका साकारल्या होत्या. बसये बंधू यांच्या हस्ते मराठवाडा भूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांनी गंगाधर मनोहर तमाशा मंडळ पार्टी निर्माण करुन गावोगावी मनोरंजनातून समाजप्रबोधन केलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version