पुणे ६ फेब्रुवारी २०२५: पुण्यात डेंग्यू आणि कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. शहरात रक्ताचा पुरवठा समाधानकारक असला तरी, प्लेटलेट्सची मोठी कमतरता जाणवत आहे.
प्लेटलेट्सची कमतरता चिंतेचा विषय
डेंगू आणि कॅन्सरच्या उपचारांसाठी प्लेटलेट्स अत्यंत आवश्यक असतात. परंतु, त्यांची उपलब्धता केवळ ४ दिवसांपर्यंत असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नातेवाईकांना प्लेटलेट्स मिळवण्यासाठी अनेक रक्तपेढ्यांमध्ये धावावे लागत आहे.
‘रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड’ यांचे आवाहन
या गंभीर परिस्थितीवर रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी नागरिकांना रक्तदान आणि प्लेटलेट दान करण्याचे आवाहन केले आहे. “प्लेटलेट्सची कमतरता गंभीर आहे आणि रुग्णांच्या जीवनावर परिणाम करू शकते. त्यामुळे, सर्वांनी पुढे येऊन मदत करणे आवश्यक आहे,” असे बांगड म्हणाले.
नागरिकांच्या मदतीची अपेक्षा
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या समस्येवर मात करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान आणि प्लेटलेट दान करणे गरजेचे आहे. नियमित रक्तदान करणाऱ्या व्यक्तींनी प्लेटलेट्स दान करण्याबाबत जागरूकता दर्शवणे आवश्यक आहे. प्लेटलेट्स दान करणे एक सोपी प्रक्रिया असून, ती दर १५ दिवसांनी करता येते.
स्वयंसेवी संस्था आणि सरकारी यंत्रणांनी पुढाकार घेण्याची गरज
प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे गंभीर रुग्णांचे जीव धोक्यात येऊ नयेत, यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकारी यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनीही या गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवून मदतीसाठी पुढे यावे, जेणेकरून अनेकांना नवजीवन मिळू शकेल
प्लेटलेट्स फक्त ४ दिवस टिकतात!
रक्त साधारणपणे ३५ दिवसांनी कालबाह्य होते, तर प्लेटलेट्स ४ दिवसातच कालबाह्य होतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे