नेकनूर, बीड १० जुलै २०२३: तीन महिन्यांपासून बंद असलेल्या जिजाऊ माँसाहेब पतसंस्थेच्या अध्यक्षांनी, नेकनूरमध्ये लोकांना काही दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मोठा कालावधी लोटूनही पैसे मिळत नसल्याने अखेर ठेवीदारांनी आज सकाळी ११ वाजता, नेकनूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. नेकनूर शाखेत आठ ते दहा कोटींच्या ठेवी अडकल्याची माहिती मिळाली आहे.
नेकनूरमध्ये एकच राष्ट्रीयकृत बँक आहे. या ठिकाणी अशिक्षित माणसांना व्यवहार करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे अनेक नागरिकांनी सुलभ व्यवहार करण्यासाठी पतसंस्थेचा मार्ग निवडला. पंधरा वर्षांत सामान्य लोकांमध्ये अनिता बबन शिंदे यांच्या जिजाऊ माँसाहेब पतसंस्थेने लौकिक मिळवला होता, त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून, नातेवाईक मित्रमंडळी समवेत पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या. आता त्या अडकल्या आहेत.
दरम्यान गोल्ड लोनचे पैसे घेत, काही खातेदारांना १५, २० हजार देत उर्वरित रक्कम लवकरच देण्याचे आश्वासन शिंदे दांपत्याने दिले. मात्र अनेक तारखा उलटून गेल्याने नेकनूर शाखेतील ठेवीदारांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी पोलिसांनी त्यांना धीर देत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर